केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत केलेल्या अपमानजनक वक्तव्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची मनुवादी वृती आणि महामानवाबद्दलची घृणास्पद भूमिका पुन्हा लोकांसमोर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलित, दिनदुबळे, मागास समाजाचे आराध्य दैवत व अस्मिता आहेत. आमच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न कदापी खपवून घेणार नाही. बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या अमित शहा यांनी माफी मागावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानाने संतप्त झालेल्या काँग्रेस खासदारांनी संसदेसमोर आंदोलन करत आरएसएस, भाजपा व अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, अमित शहा यांच्या वक्तव्याचा जितका निषेध करता येईल तितका कमी आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांवर होणाऱ्या अन्यायाला कायमच “आउट ऑफ फॅशन” केले आहे. नेमकी हीच बाब आरएसएस आणि भाजपला खटकते. बाबासाहेबांनी उच्च नीच, जातपात यांची बंधने तोडून प्रत्येकाला आपण सर्वप्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय आहोत, अशी शिकवण दिली. बाबासाहेबांनी आरएसएसच्या मनुवादी विचारसरणीला संविधानाच्या माध्यमातून गाडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे देशासाठी केले ते आरएसएस, भाजपा व अमित शहा यांच्या पुढच्या शंभर पिढ्यांनाही साध्य करता येणार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून दिला आहे हे भाजपाच्या मनुवादी विकृतीच्या पचनी पडत नाही. बाबासाहेबांनी दिलेले संविधान त्यांना मान्य नाही, कधी ते बाबासाहेबांचा पुतळा जाळतात तर कधी संविधान बदलण्याची विधाने करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले तर अमित शहा यांना एवढा राग येण्याचे काय कारण. आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या भाजपाला लोकसभेत धडा शिकवला आहे. भाजपाला कायमचे सत्तेतून दूर ठेवण्यासाठी आंबेडकरी विचाराच्या तसेच संविधानाला माननाऱ्या जनतेने संकल्प करावा, असे आवाहनही खासदार वर्षा गायकवाड यांनी केले आहे.