मला मंत्रीपद मिळालं नाही त्यामुळे माझी आई आजारी पडली आहे. मी नारज नाही, पण दु:खी आहे. कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, मंत्रीपद न मिळाल्याने मिंधे गटाच्या प्रकाश सुर्वेंचा तिळपापड झाला आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुळे दहिसरमध्ये प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाबाहेर समर्थकांनी घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल 23 दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळात भाजप 19, शिंदे गट 11 तर अजित पवार गटाचे 9 सदस्यांना स्थान मिळाले आहे. मात्र मागील मंत्रिमंडळातील अनेक नेत्यांना डच्चू देण्यात आला. मिंधे गटाच्या अब्दुल सत्तार, तानाजी सांवत, दीपक केसरकर यांच्यासह काही इच्छूक आमदारांचा सुद्धा या यादीमध्ये समावेश आहे. त्यामुळे नाराज आमदार विविध माध्यमांतून आपली खदखद व्यक्त करत आहेत. अशातच आमदार प्रकाश सुर्वे यांनी मंत्रिपद न मिळाल्याने माझी आई आजारी पडल्याचे वक्तव्य केले आहे. मंत्रिपद न मिळाल्याने दु:ख कायम आहे. पण मी काम करेन, महापालिकेत चांगल काम करेन, असे प्रकाश सुर्वे दहिसरमधील कार्यालयाबाहेर नाराज कार्यकर्त्याशी संवाद साधताना म्हणाले.