आंबेडकरांच्या ऐवजी देवाचं नाव घ्या…, अमित शहांचं राज्यसभेत वादग्रस्त वक्तव्य; संसदेत विरोधक आक्रमक, जय भीमच्या घोषणा

आजकाल आंबेडकरांचं नाव घेण्याची फॅशन झाली आहे. आंबेडकरांच्या ऐवजी देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्म स्वार्गात जागा मिळाली असती, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत केले होते. या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. संसदेत आणि संसदेच्या बाहेर याचे पडसाद उमटले.

संसदेबाहेर विरोधी पक्षांच्या खासदारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हाती घेत घोषणा दिल्या. अमित शहा माफी मांगो… माफी मांगो, बाबासाहेब का अपमान नही सहेंगे… नही सहेंगे…, संघ का विधान नही चलेगा… नही चलेगा, बाबासाहेब का अपमान नही सहेगा हिंदुस्थान, अशा घोषणा यावेळी खासदारांनी दिल्या. लोकसभा विरोधी पक्षनेते काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधी पक्षांतील अनेक प्रमुख नेत्यांनी अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध केला.

संसदेतही याचे पडसाद उमटले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आंबेडकरांवरील वक्तव्यावरून संसदेत विरोधकांकडून जय भीमच्या घोषणा देण्यात आल्या. लोकसभा, राज्यसभेत कामकाज सुरू होताच जय भीमच्या घोषणा देण्यात आल्या. यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.