Ashwin Retirement – “माझ्यातला पंच अजूनही बाकी आहे…” निवृत्तीनंतर आर. अश्विनचे मोठे वक्तव्य

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पार पडलेली गॅबा कसोटी पावसाच्या व्यत्यामुळे अनिर्णित घोषीत करण्यात आली. त्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर माझ्यातला ‘पंच’ अजूनही बाकी असल्याचे त्याने म्हटले आहे.

गॅबा कसोटी अनिर्णित झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या सोबत रविचंद्रन अश्विनने सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये हजेरी लावली. त्यावेळी त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. “मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. आज टीम इंडियाचा खेळाडू म्हणून माझा शेवटचा दिवस होता. मला वाटतंय की, एक क्रिकेटर म्हणून माझ्यामध्ये अजूनही पंच बाकी आहे, पण मी माझा खेळ क्लब क्रिकेटमध्ये दाखवेन. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटर म्हणून हा माझा शेवटचा दिवस होता, असे म्हणत त्याने निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले.

“मी माझ्या करिअरमध्ये खूप मज्जा केली आणि रोहित आणि संघातील सहकाऱ्यांसोबत माझ्या अनेक आठवणी आहेत. मला बऱ्याच जणांचे आभार मानायचे आहेत. BCCI, माझा संघ आणि सर्व प्रशिक्षकांचे मी आभार मानतो, असे म्हणत अश्विनने सर्वांचे आभार मानले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी रविंचंद्रन अश्विनच्या फिरकीची जादू आपल्याला पहायला मिळणार नसली, तरी IPL मध्ये त्याच्या फिरकीची जादू आपल्याला पहायला मिळणार आहे.

टीम इंडियाचा दिग्गज माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्यानंतर रविचंद्रन अश्विन हा कसोटी क्रिकेटमधील टीम इंडियाचा दुसरा सर्वात यशस्वी फिरकीपटू आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीमध्ये 106 सामने खेळले असून 357 विकेट घेतल्या आहेत. त्याच बरोबर अश्विनने 116 वनडे सामन्यांमध्ये 156 आणि 65 टी-20 सामन्यांमध्ये 72 विकेट घेतल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 5 विकेट घेण्याची किमया 37 वेळा साधली आहे.