मुंबईत गेल्या आठवड्यात कुर्ल्याच्या बेस्ट बस अपघातात मृत्युचे तांडव पाहायला मिळाले. या अपघातात अनेक निष्पाप जणांना आपला जीव गमवावा लागला. ही घटना ताजी असताना गोवंडीतही बेस्ट बसच्या अपघाताची घटना घडली. सलग घडणाऱ्या या घटनांनतर मुंबईतील बेस्ट प्रशासनाने देखील या घटनेची गंभीर दखल घेत कारवाई केली व काही सूचनाही दिल्या आहेत. मात्र, असे असतानाही अंधेरीत एक धक्कादायक घटना घडली. दारुच्या नशेत बस चालवणाऱ्या चालकाला आणि वाहकाला अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे.
साकीनाका योगीराज शाळेच्या मुलांसाठी बुधवारी शालेय सहलीचे आयोजन केले होते. यासाठी शाळेच्या 50 मुलांना घेऊन जाण्यासाठी खासगी बसची व्यवस्था केली होती. दरम्यान, या मुलांना पिकनिकला घेऊन जाणारा खासगी बस चालक आणि क्लीनर दारुच्या नशेत अंधेरी कुर्ला रोडवर विचित्रपणे बस चालवताना आढळून आला. यावेळी ही बाब वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी ती बस थांबवली. त्यामुळे बसमधील 50 विद्यार्थी आणि शिक्षकांचा जीव वाचला. मात्र, या घटनांमुळे शालेय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमद्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अंधेरी पोलिसांनी बस चालवणाऱ्या चालकाला आणि वाहकाला अटक केली आहे. तसेच या दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 281,125 आणि मोटार वाहन कायदा 184,185 चा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.