संसद परिसरात बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांविरोधात निदर्शने, ‘हिंदू, ख्रिश्चनांच्या मागे उभे राहा’ लिहिलेली बॅग घेऊन प्रियंका सभागृहात

सोमवारी पॅलेस्टाईनच्या पाठिंब्याची बॅग संसदेत आणल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी बांगलादेशातील हिंदू, ख्रिश्चनांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध दर्शवणारी बॅग घेऊन संसदेत प्रवेश केला. अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी संसद परिसरात काँग्रेस खासदारांनी बांगलादेशात हिंदू आणि ख्रिश्चनांवर होणाऱ्या अत्याचारावर केंद्र सरकार एक शब्दही बोलत नाही, असा आरोप करत आंदोलन केले.

प्रियंका गांधी यांच्या हातातील बॅगेवर बांगलादेशातील हिंदू आणि ख्रिश्चनांच्यामागे उभे राहा असे लिहिलेली बॅग होती. काँग्रेस खासदारांच्या आंदोलनावेळी सर्वांच्या हातात ही खास बॅग दिसली. त्याचबरोबर बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांचा विरोध दर्शवणारे फलकही यावेळी सर्वांनी झळकवले. परदेशातही दोन दिवसांपासून प्रियंका गांधी यांचीच चर्चा आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला एक वर्ष पूर्ण झाले तेव्हाही प्रियंका गांधी यांनी इस्रायलला लक्ष्य केले होते. तसेच इस्रायलच्या पंतप्रधानांवरही टीका केली होती. यानंतर पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी प्रियंका गांधींचे कौतुक केले होते.

ऑगस्ट 2024 मध्ये सर्वाधिक हल्ले

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर बांगलादेशात सातत्याने अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत. सेंटर फॉर डेमोक्रेसी प्ल्युरलिज्म अँड ह्युमन राइट्सच्या अहवालानुसार 5 ते 9 ऑगस्टदरम्यान बांगलादेशात हिंदुंवर हल्ले आणि लुटीच्या तब्बल 190 घटना घडल्या. दरम्यान, शेख हसीना यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी बांगलादेशने आंतरराष्ट्रीय गुन्हे प्राधिकरणाला आणखी 2 महिन्यांची मुदत वाढवून दिली आहे.