लहान मुलांच्या खरेदी-विक्री प्रकरणात माटुंगा पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. कर्नाटकच्या हुक्केरी येथून त्या आरोपीला पकडण्यात आले असून आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या दहा झाली आहे. तसेच या आरोपींच्या चौकशीत धक्कादायक बाब समोर आली आहे.
दादर येथील एका विवाहितेने तिच्या सवा महिन्याच्या मुलीला अवघ्या एक लाखात विकले होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर उपायुक्त रागसुधा आर यांच्या मार्गदर्शनाखाली माटुंगा पोलिसांनी झटपट तपास करत त्या निर्दयी मातेसह लहान बालकांची खरेदी विक्री करणाऱ्या नऊ जणांचे रॅकेट उद्ध्वस्त केले होते. या रॅकेटमधील आणखी एक आरोपी अब्दुलकरिम नदाफ (52) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता दहा इतकी झाली आहे.
उपायुक्त रागसुधा आर यांच्या मार्गदर्शनाखाली बालकांची खरेदी-विक्री करणाऱ्या दहा जणांचे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले. त्यानंतर अटक आरोपींकडे कसून चौकशी केली असता आणखी धक्कादायक बाब समोर आली. या रॅकेटने आणखी चार बालकांची विक्री केल्याचे समोर आले. त्यात दोन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे. दीड ते दोन महिन्यांची ही बालके असून अडीच ते साडेतीन लाखांत त्यांची विक्री केल्याचे आरोपींच्या चौकशीत समोर आले आहे. या चारपैकी एक बालक संभाजीनगर, एक पुण्याचे तर दोन गुजरात राज्यातील आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.