कोकण कट्टाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कोकणसन्मान सोहळा 2024 चे आयोजन 19 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. विलेपार्लेच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात रात्री 8 वाजल्यापासून हा सोहळा रंगणार असून यावेळी ‘सुरश्री’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरांचीही बरसात होणार आहे. दै. सामना या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे.
सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱयांचा सन्मान करण्यात येणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात मास्टर्स क्लासेसचे गौरव सावे, उद्योजक अथर्व ग्रुपचे सचिन गुंजाळ, आरोग्यसाठी दंतचिकित्सक डॉ. रोहित कर्णिक, कलाकार प्रसिद्ध अभिनेते दिगंबर नाईक, पत्रकार अरविंद गुरव, सामाजिक क्षेत्रासाठी करुणेश्वर वृद्धाश्रमाचे इश्वर ढोरे, सेवाभावी म्हणून साईसहारा, पेणचे कल्पेश ठाकूर यांचा गौरव होणार आहे, अशी माहिती कोकण कट्टाचे संस्थापक अजित पितळे आणि अध्यक्ष नितीन कुलकर्णी यांनी दिली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कुपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर उपस्थित राहणार आहेत. अनिल देसाई यांच्या वतीने प्रसिद्ध गायक सुदेश भोसले आणि श्रीकांत नारायण यांच्यासह 20 नामवंत गायकांच्या सुरेल आवाजातील हिंदी, मराठी गीतांचा सुरश्री सोहळाही रंगणार आहे, अशी माहिती कोकण कट्टाचे सचिव सुनिल वनकुंद्रे आणि खजिनदार सुजित कदम यांनी दिली.