दादर पश्चिम येथील भंडारी को.ऑपरेटिव्ह बँकेच्या अवसायक आणि रिकव्हरी ऑफिसरकडून बँकेच्या स्वमालकीच्या प्रॉपर्टींची बेकायदेशीररीत्या भ्रष्टाचार करून विक्री करीत असल्याचा आरोप बँकेच्या शेअर होल्डर्स फोरमने केला असून हा भ्रष्टाचारी लिलाव थांबवून दोषींवर कारवाई करा, अशी मागणीही फोरमने केली आहे. याबाबत फोरमने सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे यांना निवेदन दिले आहे.
बँकेच्या अवसायक राखी गावडे आणि बँकेचे रिकव्हरी ऑफिसर नझीम विराणी यांनी भंडारी को-ऑप. बँकेच्या दादर येथील मुख्य इमारतीच्या (बेसमेंट प्लस तळमजला पहिला प्लस दुसरा आणि तिसरा मजला) जागेची विक्री किंमत दोन वर्षांपूर्वी उच्च न्यायालयासमोर शपथपत्र सादर करताना व्हॅल्युएशन रक्कम सुमारे रुपये 62 ते 66 कोटी दाखविण्यात आलेली आहे. परंतु आता वृत्तपत्रामध्ये भंडारी बँक – मुख्य इमारत – जागा विक्री संबंधीची जाहिरात देऊन जागेची किंमत 55 कोटी दाखवली आहे. विक्रीच्या रक्कमेत सुमारे 10 कोटींची तफावत दिसून येत आहे. म्हणजेच राखी गावडे आणि नझीम विराणी यांनी 10 कोटींचा भ्रष्टाचार करण्यासाठी हा डाव आखल्याचा आरोपही शेअर होल्डर्सने केला.
उच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर
वास्तविक भंडारी को-ऑप. बँकेच्या स्वमालकीची कोणतीही जागा विक्री करावयाच्या असतील तर त्यासाठी मा. उच्च न्यायालयाने दि. 29/04/2015 रोजी रिट पिटीशन क्र. 2574/2013 आणि 274/2018 मध्ये याबाबत निर्देश देऊन समन्वयाने आणि कायदेशीरपणे बँकेच्या स्वमालकीच्या जागा विक्री करण्यासाठी विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक आणि अवसायक अशी पाच सदस्यीय समिती नेमली आहे. असे असताना अवसायक आणि रिकव्हरी ऑफिसर मनमानीपणे जागा विक्रीचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही बँकेच्या शेअर्स होल्डर्स फोरमने केला आहे.