पालिका अंबरनाथमधील डंपिंग प्रकल्प गुंडाळणार, आता कचऱ्यापासून वीज प्रकल्पावर लक्ष

मुंबईतील कचरा अंबरनाथमधील करवले गावी येथे नेऊन डंपिंग करण्याचा प्रकल्प पालिका आता गुंडाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जागेचे भूसंपादनही बारगळले असून या प्रकल्पाला स्थानिकांचाही प्रचंड विरोध आहे. त्यामुळे पालिका आता या प्रकल्पाला पर्याय म्हणून देवनार डंपिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून वीज तयार करण्याच्या प्रकल्पाला गती देणार आहे.

कांजूरमार्ग आणि देवनार डंपिंग ग्राऊंडची क्षमता संपत आल्याने अंबरनाथमधील करवले गाव येथे डंपिंग ग्राऊंड स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू होत्या. यासाठी पालिकेने भूसंपादनही सुरू केले होते. प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध होता. या प्रकल्पात राज्य सरकारने सप्टेंबर 2015 मध्ये 52 हेक्टर जागा पालिकेला देण्याची तयारी दर्शवली. यातील 39.90 हेक्टर जागेसाठी 12.35 कोटीपैकी 10 कोटी रुपये शुल्क पालिकेने सरकारला भरले होते. आतापर्यंत सरकारची बारा हेक्टर जागा पालिकेच्या ताब्यात आली असून खासगी एकही हेक्टर जागा मिळालेली नाही. त्यामुळे पालिकेने आता या ठिकाणचे भूसंपादन बंद करून ताब्यात घेतलेल्या जागेबाबत निर्णायक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पालिकेच्या घनकचरा विभागाला कार्यवाही करण्याचे निर्देश पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी दिल्याचे समजते.

देवनारसह कांजूर डंपिंग ग्राऊंडवरही कचऱ्यापासून वीजनिर्मिती

देवनार डंपिंग ग्राऊंडमध्ये दररोज टाकल्या जाणाऱ्या सुमारे 600 मेट्रिक टन कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा पालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. या ठिकाणी दररोज चार मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे. या प्लांटमधून ऑक्टोबर 2025 पर्यंत वीज उत्पादन सुरू होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. तर देवनारप्रमाणेच कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंडमध्येही आगामी काळात वीजनिर्मिती केली जाणार आहे. कांजूरमार्गमध्ये टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यातून दिवसाला 60 मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प राबवणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले.