वाह रे दादाचा वादा, कसला वादा, अन् कसला दादा; छगन भुजबळांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर व्यक्त केला संताप

अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. त्यामुळे छगन भुजबळ नाराज झाले असून त्यांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला होता. आता येवल्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी थेट अजित पवार यांच्याबाबत संताप व्यक्त केला आहे. वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा, असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

येवल्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुकही केले. शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, त्यावेळी मी त्यांच्यासोबत राहिलो. शरद पवारांनी मला उपमुख्यमंत्रीपद दिले, गृहमंत्री बनवले, असे ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी थेट अजित पवार यांच्यावर हल्ला चढवला. लोकसभेवेळी अमित शहा यांनी सांगितले की नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळ यांनी लढवावी. तीन आठवडे नाव जाहीर केले नाही. त्यानंतर मी नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले. त्यावेळी अजित पवार बोलले भुजबळांनी घाई केली, मग इतके दिवस का नाही सांगितले? मी दूध पिता बच्चा आहे का? मला कळत नाही का? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

आता मला राज्यसभेवर पाठवण्याबाबत बोलत आहेत. हा काय पोरखेळ आहे का? लोकांनी मला निवडून दिले, त्यांना मी काय तोंड काय दाखवू. त्यांना भुजबळांचा बळी घ्यायचा होता का? छगन भुजबळ काय लल्लू पाटील आहे का? हा काही पोरखेळ आहे का? माझ्या मनात मंत्रीपदाबाबत शंका होती, अन् त्याप्रमाणे झाले. माझी जर किंमत नसेल तर काय उपयोग? दादाचा वादा. वाह रे दादाचा वादा, कसला वादा, अन् कसला दादा, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला आहे.