उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची घेतली भेट; आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण

आज नागपुरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. राजकीय प्रगल्भता या दोन नेत्यांची भेट झाली अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली.

माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आज उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. महाराष्ट्र हितासाठी आणि देशाच्या हितासाठी दोन्ही नेत्यांनी राजकीय प्रगल्भता दाखवत एक पाऊल पुढे टाकले आहे. भलेही आम्ही विरोधी पक्षात आहोत, ते सत्ताधारी पक्षात आहेत. असे असले तरी आम्ही सारे जनतेतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहोत असे आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच ईव्हीएमबद्दल आम्हाला संशय आहेच. 76 लाख मतं कशी वाढली हा प्रश्न आहेच. हे मुद्दे आहेतच. पण राज्याचा विकास झाला पाहिजे अशी आमची भुमिका आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.