24 वर्षांनी कोर्टाची लढाई जिंकली अन् वयाच्या 66 व्या वर्षी LLB ला प्रवेश, वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

गुजरातमधील शशिकुमार मोहता यांच्या 24 वर्षांच्या लढाईला अखेर यश मिळाले आणि वयाच्या 66 व्या वर्षी LLB ला प्रवेश घेण्याचा त्यांचा मार्ग कोर्टाने खुला करून दिला. 2000 साली गुजरात युनिवर्सिटीच्या डीटी कॉलेजमध्ये LLB ला प्रवेश घेण्यासाठी गेलेल्या शशिकुमार मोहता यांना कॉलेजने प्रवेश नाकारला होता. या विरोधात त्यांनी 2001 साली कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती.

कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार, पुढील शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून 3 वर्षांसाठी LLB ला प्रवेश घेण्याची परवानगी याचिकाकर्ते शशिकुमार मोहता यांना देण्यात आली आहे. त्याच बरोबर याचिकाकर्ते शशिकुमार मोहता यांचा कायदेशीर खटल्याचा संपूर्ण खर्च उचलण्याचेही आदेश कोर्टाने दिले आहेत. कायद्याची पदवी प्राप्त करणे हे अहमदाबादच्या शशिकुमार मोहता यांचे स्वप्न होते. त्यासाठी 14 वर्षांचे औपचारिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले होते. परंतु गुजरातमध्ये LLB ला प्रवेश घेण्यासाठी 15 वर्षांचे औपचारिक शिक्षण पूर्ण करणे अनिवार्य होते. त्यामुळे डीटी लॉ कॉलेजने शशिकुमार मोहता यांना नियमामुसार प्रवेश नाकारला होता. याविरोधात शशिकुमार मोहता यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती.

शशिकुमार मोहता यांनी कोर्टामध्ये दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कोलकातामध्ये पूर्ण झाले. तेव्हा कोलकातामध्ये 11+3 अशा शैक्षणिक पॅटर्न होता. त्यानुसार शशिकुमार मोहता यांनी 11 वर्ष शालेय शिक्षण आणि त्यानंतर 3 वर्ष वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली होती. शशिकुमार मोहता 1980 साली कोलकाताहून अहमदाबादमध्ये स्थलांतरीत झाले. त्यानंतर 2000 साली LLB ला प्रवेश घेण्यासाठी त्यांनी अर्ज केला असता त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता.