समाजासमोर आदर्शन ठेवणारी एक बातमी देहराडूनमधून समोर आली आहे. येथील एका दाम्पत्याला आई-वडील होण्याचा आनंद मिळाला. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. अवघ्या अडीच दिवसानंतर त्यांच्या तानुल्ह्या बाळाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दु:खाचा डोंगर असतानाही बाळाच्या आई-वडिलांनी मृतदेह वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाच्या उद्देशाने दान करण्याचा निर्णय घेतला आहे. बाळाच्या देहाचे दान हे देशातील सर्वात तरुण शरीर दान असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या तानुल्ह्या बाळाचा जन्म 8 डिसेंबर रोजी झाला आहे. त्या बाळाला जन्मानंतर श्वास घ्यायला त्रास होत होता. अशावेळी बाळाला पेटीत ठेवण्यात आले. ते बाळ hypoxic-ischemic encephalopathy (HIE) मेंदूसंदर्भातील आजारामुळे त्याला वाचवता आले नाही. त्यामुळे जन्माच्या अवघ्या साठ तासानंतर बाळाचा मृत्यू झाला. राम मेहर कश्यप आणि त्यांची पत्नी नॅन्सी हे बाळाचे आई-वडील आहेत. ते हरिद्वारचे रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या बाळाचा देह वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाच्या उद्देशाने दान करण्याचा निर्णय घेतला. दधिची देहदान समिती एनजीओशी संबंधित असलेल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने देह दानाबाबत मार्गदर्शन त्यांना मिळाले. एनजीओचे खजिनदार कृष्ण कुमार अरोरा यांच्या म्हणण्यानुसार, एका आठवड्याच्या बाळाचा देह यापूर्वी एम्स दिल्ली येथे दान करण्यात आला होता.
राम मेहेर यांना अडीच वर्षांची रुद्राक्ष नावाची मुलगी आहे. डून मेडिकल कॉलेजमधील शरीरशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. महेंद्र नारायण पंत म्हणाले की, ही अभूतपूर्व घटना आहे. एवढ्या लहान वयात कोणीही देह दान केले नसल्याचे त्यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले, जेव्हा त्यांना दधिची देहदान समितीचा फोन आला तेव्हा रुग्णालयाने बाळाचा देह स्वीकारण्यापूर्वी या विषयावर सखोल चर्चा केली, तिचे नाव त्यांनी ‘सरस्वती’ ठेवले. पंत म्हणाले की, आतापर्यंत 45 वर्षांवरील लोकांचे डून मेडीकल कॉलेजला देह दान केले होते. मात्र अडीच दिवसांच्या तान्हुल्याच्या देहदानाने इतिहास रचला आहे. बाळाच्या देहाचा उपयोग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून वैद्यकीय अभ्यासासाठी केला जाईल.