अजित पवार गटाचे नेते, आमदार छगन भुजबळ यांच्या नाराजीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना भाजपला फटकारले आहे. ”आमचा पक्ष फोडताना जी अदृश्य महाशक्ती एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी होती त्याच महाशक्तीने भुजबळांना मनोज जरांगेविरोधात उत्तेजन दिलं. त्यातच त्यांचा बळी गेला’, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली.
छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत भुजबळांनी टोकाची भूमिका घेतली होती. आमचं त्यांना म्हणनं होतं की त्यांनी थोडा संयम पाळायला हवा होता. कारण दोन्ही समाज महाराष्ट्रातील प्रमुख समाज आहेत. मात्र भुजबळांना टोकाची भूमिका घ्यायला लावली. मनोज जरांगेंच्या लढ्याला विरोध करण्यासाठी छगन भुजबळांचा टोकाचा वापर झाला. ज्यांनी त्यांना ही भूमिका घ्यायला आता त्यांनी आता त्यांना वाऱ्यावर सोडलंय. एक अदृश्य महाशक्ती जी शिंदेना आमचा पक्ष फोडण्यासाठी पाठिंबा देत होती तिच अदृश्य शक्ती भुजबळांना उत्तेजन देत होती. यात भुजबळांचा बळी गेला आहे. आता भुजबळांनी किती आदळआपट केली तरी त्यांची लढण्याची शारीरिक व मानसिक ताकद राहिली ते बघावं लागेल. महाराष्ट्रात जातीय सलोखा रहावा ही आमची भूमिका आहे. बाकी इतर नाराज लोकं अश्रू ढाळतायत त्यांच्या अश्रूंना कोण विचारतंय. पुरंदरचे आमदार, बोरिवलीचे आमदार, आमचे सुधीर भाऊ यांच्या अश्रूंना काय किंमत आहे. एखाद दुसरा आमदार नाराज झाला तर या सरकारला काही फरक पडणार नाही. एखाद दिवस ते रडतील नंतर त्यांच्या हातात एखादं खुळखुळं दिला जाईल”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
”मला आश्चर्य वाटतंय फडणवीसांच्या मंत्रीमंत्रीमंडळात जे नमुणे आहेत नग आहेत, त्यासंदर्बात फडणवीसांनी अभ्यास केला पाहिजे. काही वर्षांपूर्वी तुम्ही या नगांविषयी काय आरोप केले होते, किती प्रकारचे भ्रष्टाचाराचे पेपर तुम्ही राज्यपालांकडे सोपवले होते. या भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन आता फडणवीस आदर्श कारभार करणार आहेत असं मी ऐकलं वाचलं आणि आमचं मनोरंजन झालं, पुढच्या पाच वर्षात असे अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.
वन नेशन वन इलेक्शन विधेयकावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, एक देश एक निवडणूक या गोष्टी संघराज्याने बनलेल्या देशासाठी किती घातक आहे ते भविष्यात कळेल. तुम्ही एकीकडे संविधानावर चर्चा करताय. आणि दुसरीकडे ज्या गोष्टी संविधानाला मान्य नाही त्या लादण्याचा प्रयत्न करतायत. मुंबईसह 14 महानगरपालिकेच्या निवडणूका घेऊ शकत नाही. याचा अर्थ सरळ आहे की तुमच्या मनात पाप आहे, तुमचा विचार सरळ नाही. तुम्हाला भविष्यात या देशात लोकशाही मोडून काढायची आहे. सर्व संविधानिक संस्था ताब्यात घेऊन इथे घोषित हुकुमशाही स्थापित करायची आहे, असे संजय राऊत म्हणाले.