राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घराणेशाही आणि घराणेशाहीला मदत करण्यासाठी काँग्रेस पक्ष घटना दुरुस्ती करत राहिला, असा आरोप केला. याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जळजळीत शब्दांत उत्तर दिले. संविधान तयार केल्यानंतर याच लोकांनी रामलीला मैदानात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लावून संविधान जाळले होते. आता हेच लोक नेहरू, इंदिरा आणि संपूर्ण कुटुंबाला शिव्या देत आहेत, असे खरगे म्हणाले.
विरोधकांचे शब्द केवळ जुमले आहेत असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला, परंतु तुम्ही सर्वात मोठे लबाड आहात. तुमच्या 15 लाखांच्या आश्वासनाचे काय झाले? असा सवाल खरगे यांनी केला. आम्ही पालिका शाळेत शिकलो. ते जेएनयूमध्ये शिकले. त्यांचे इंग्रजी चांगले असू शकते, पण आम्हीही संविधान वाचले आहे, असे खरगे म्हणाले.
भाजप आरक्षणविरोधी
भाजपचे धोरण हे नेहमीच आरक्षणविरोधी राहिलेले आहे. त्यांना कसलेच आरक्षण नकोय, असे सांगत राज्यसभेत आज विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप व सत्तापक्षावर हल्लाबोल केला. राज्यसभेत आजपासून भारतीय राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने विशेष चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेला सुरुवात करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉंग्रेसने केवळ एका घराण्याच्या भल्यासाठी घटनेचा दुरुपयोग केला, असा गंभीर आरोप केला. त्यावर पलटवार करताना खरगेंनी भाजपपेक्षा आमच्या सरकारने महिला आरक्षणही अधिक वेगाने दिले. दीनदुबळय़ांच्या हक्कांसाठी कॉंग्रेसची बांधीलकी कायम आहे. याउलट भाजप आरक्षणविरोधी असून त्यांना आरक्षण संपवायचे आहे, असा गंभीर आरोपही खरगेंनी केला.
मोदींनी स्वतःला तीस मारखान समजू नये
तुम्ही पंतप्रधान आहात, आम्ही तुमचा आदर करतो, पण काँग्रेसच्या राजवटीत संविधान दुरुस्तीबाबत देशाची दिशाभूल करण्याबाबत बोलू नका, असे खरगे म्हणाले. गेल्या 70 वर्षांत जे घडले त्यामुळे तुम्ही डॉक्टर आणि इंजिनीअर झाला. मोदी पंतप्रधान झाले. मी कामगारपुत्र विरोधी पक्षनेता झालो. स्वतःला तीस मारखान समजू नका, ही नेहरूंची देणगी आहे, अशा शब्दांत खरगे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणाला जोरदार प्रत्युत्तर दिले.