राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व, सांघिक जेतेपदासह महिला गटाचेही विजेतेपद पटकावले

बंगळुरू येथे झालेल्या पाचव्या वरिष्ठ राष्ट्रीय योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राने दबदबा राखताना 5 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य अशी एकूण आठ पदकांची कमाई केली. या जोरावर महाराष्ट्राने सांघिक जेतेपदासह महिला गटाचे विजेतेपदही पटकावले.

योगासन हिंदुस्थानच्या वतीने आणि कर्नाटक योगासन क्रीडा संघटनेच्या यजमानपदाखाली तुमकूर (बंगळुरू) येथील महात्मा गांधी स्टेडियम येथे ही स्पर्धा पार पडली. महाराष्ट्र योगासन क्रीडा संघटनेचे (एमवायएसए) अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, तांत्रिक संचालक सतीश मोहगावकर, सचिव राजेश पवार, राज्य व्यवस्थापक हृषीकेश बागडे आणि हर्षल छुते यांच्यासह पुरुष संघाचे प्रशिक्षक संदेश खरे आणि महिला संघाच्या प्रशिक्षिका हेमवंता सोनावणे-नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने यशस्वी कामगिरी केली.

महिला गटात महाराष्ट्राने एकहाती दबदबा राखला. वरिष्ठ अ पारंपरिक योगासन गटात सोनाली खरमाते हिने संयुक्तपणे सुवर्ण पटकावले. तिच्यासह मध्य प्रदेशच्या आरती पालनेही सुवर्ण जिंकले. दोघींनी प्रत्येकी 58.88 गुणांची कमाई केली. तन्वी रेडिजने वरिष्ठ गटात कलात्मक योगासन एकेरीत 127.5 गुणांसह सुवर्ण पटकावले. तिने तामिळनाडूच्या वैष्णवी सर्वणाकुमारचे (124.3) आव्हान परतावले. पूर्वा किनारे-प्राप्ती किनारे यांनी वरिष्ठ कलात्मक दुहेरी गटात महाराष्ट्राला सुवर्ण पटकावून दिले.