पावसाच्या सरी अन् फलंदाजांची हाराकिरी! 17 षटकांच्या खेळात हिंदुस्थानची 4 बाद 51 अशी दैना

गॅबावर ऑस्ट्रेलियाने ताबा मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. गॅबाच्या ज्या खेळपट्टीवर ट्रव्हिस हेड व स्टीव्हन स्मिथ या ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दणकेबाज शतके ठोकली, अ‍ॅलेक्स कॅरीने सहजसुंदर अर्धशतक झळकवले, त्याच खेळपट्टीवर हिंदुस्थानी फलंदाजांची मात्र उर्वरित 17 षटकांच्या खेळात 4 बाद 51 अशी दैना उडाली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 445 धावांना प्रत्युत्तर देताना ब्रिस्बेनमध्ये सोमवारी पावसाचा लपंडाव सुरू असताना हिंदुस्थानच्या रथी-महारथी फलंदाजांनी हाराकिरी केली. बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेतील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात सध्या ऑस्ट्रेलियन संघ ड्रायव्हर सीटवर आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा लोकेश राहुल 33 धावांवर खेळत होता, तर कर्णधार रोहित शर्मा शून्यावर त्याला साथ देत होता. राहून राहून पावसाच्या सरी कोसळत असल्याने तिसऱ्या दिवशी एकूण 33 षटकांचाच खेळ होऊ शकला.

स्टार्कचा गुड स्टार्ट

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 117.1 षटकांत 445 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली; मात्र हिंदुस्थानच्या डावाची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. मिचेल स्टार्कने ऑस्टेलियाला गुड स्टार्ट दिला. त्याने दुसऱ्याच चेंडूवर यशस्वी जैसवालला (4) स्क्वेअर लेगला मिचेल मार्शकरवी झेलबाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकातील पहिल्या चेंडूवर स्टार्कने आलेल्या शुबमन गिललाही मार्शकडेच झेल देण्यास भाग पाडून हिंदुस्थानची 2 बाद 6 अशी दुर्दशा केली.

आधी बुमराला माकड म्हटले, मग माफी मागितली

इंग्लंडची माजी वेगवान गोलंदाज आणि सध्या समालोचकाच्या भूमिकेत असलेल्या इसा गुहा हिने रविवारी टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या कामगिरीचे कौतुक करताना त्याला माकड म्हटले. या वर्णद्वेषी वक्तव्यामुळे आपण टीकेचे धनी ठरत असल्याचे लक्षात येताच इसा गुहाने सोमवारी या विधानाबद्दल माफी मागितली. इसा गुहाने समालोचन करताना बुमरासाठी ‘प्राइमेट’ हा शब्द वापरला होता. त्याचा अर्थ माकड असाही होतो. गॅबा कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच ईसा गुहाने माफी मागितली. ती म्हणाली, ‘रविवारी समालोचन करताना मी एक शब्द वापरला, ज्याचे अनेक अर्थ आहेत. सर्वप्रथम मी माफी मागते. जर मी काही चुकीचं बोलली किंवा कोणाला दुखावले असेल तर माफी मागते. जर तुम्ही कॉमेंट्री संपूर्ण ऐकलीत तर तुमच्या लक्षात येईल की, मी बुमराचे कौतुक करत होते.’

कोहली, पंत यष्टीमागे झेलबाद

विराट कोहली व ऋषभ पंत यांच्याकडून टीम इंडियाला आज खूप अपेक्षा होत्या; मात्र या दोघांनी पुन्हा एकदा निराशा केली. जोस हेझलवूडने कोहलीला (3), तर कर्णधार कॅट कमिन्सने पंतला (9) यष्टीमागे झेलबाद करून हिंदुस्थानची 13.5 षटकांत 4 बाद 44 अशी दाणादाण उडविली. मात्र, दुसरा सलामीवीर लोकेश राहुलने एका बाजूने किल्ला लढविताना 64 चेंडूंत नाबाद 33 धावांची खेळी करताना 4 चेंडू सीमापार धाडले. त्याच्या या उपयुक्त खेळीमुळेच टीम इंडियाला धावफलकावर अर्धशतक झळकवता आले.

40 धावांची भर घालून ऑस्ट्रेलियाचा डाव संपला

दरम्यान, यजमान ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसाच्या 7 बाद 405 धावसंख्येवरून सोमवारी सकाळी पहिल्या डावात पुढे खेळायला सुरुवात केली. यात आणखी 40 धावांची भर घालून ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 117.1 षटकांत 445 धावांवर संपुष्टात आला. रविवारी 45 धावांवर नाबाद परतलेल्या अॅलेक्स कॅरीने 70 धावा केल्या, तर 7 धावांवर परतलेला मिचेल स्टार्क 18 धावांवर बाद झाला. ट्रव्हिस हेड (152) व स्टीव्हन स्मिथ (101) यांनी शतके ठोकल्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात चारशेपार धावसंख्या उभारता आली. हिंदुस्थानकडून जसप्रीत बुमराने सर्वाधिक 6 फलंदाज बाद केले. मोहम्मद सिराजला 2, तर आकाश दीप व नितीश कुमार रेड्डी यांना 1-1 बळी मिळाला.

विराटला सचिनची ती खेळी पाहण्याची गरज!

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आऊट ऑफ फॉर्म असलेला विराट कोहली ब्रिस्बेन कसोटीतील पहिल्या डावातही केवळ 3 धावांवर बाद झाला. त्यामुळे माजी कसोटीपटू सुनील गावसकर यांनी विराटला त्याचा आयडॉल असलेल्या सचिन तेंडुलकरची 2004 मधील सिडनी कसोटीतील नाबाद 241 धावांची खेळी पाहण्याचा सल्ला दिला. सचिनला सलग 13 डावांत शतक झळकवता आले नव्हते. त्यावेळी तो कव्हर ड्राईव्ह या आपल्या आवडत्या फटक्यावरच सातत्याने बाद होत होता. त्यामुळे सचिनने सिडनीतील चौथ्या कसोटीत एकही कव्हर ड्राईव्हचा फटका न मारता 436 चेंडूंतील संयमी खेळीत 33 चौकारांसह नाबाद 241 धावांची खेळी सजवली होती. सचिनची ही खेळी त्याच्या संयमामुळे अजरामर झाली. विराट कोहलीनेही सचिनच्या या खेळीतून धडा घेत वाईड चेंडूला छेडण्याचा हट्ट सोडायला हवा, असे मत गावसकरांनी व्यक्त केले.