मुंबईचे तापमान 5 अंशांनी घसरले

उत्तरेकडील शीतलहरींमुळे महाराष्ट्रात दाखल झालेल्या थंडीच्या लाटेचा कडाका वाढताच राहिला आहे. सोमवारी मुंबईच्या तापमानात जवळपास 5 अंशांची मोठी घसरण झाली. सांताक्रूझमध्ये 14 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान यंदाच्या हंगामातील दुसऱया क्रमांकाचे निच्चांकी तापमान ठरले. कुलाब्यातही तापमानात दोन अंशांची घट झाली. आणखी तीन दिवस मुंबई शहर आणि उपनगरांतील किमान तापमान 20 अंशांच्या खाली राहील. मंगळवारी सकाळच्या सुमारास हवेत धुके असेल. दुपारनंतर आकाश निरभ्र होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यापूर्वी 9 डिसेंबरला 13.7 अंश सेल्सियस इतके किमान तापमान नोंद झाले होते. तो दिवस दहा वर्षांतील सर्वात थंड दिवस ठरला होता.

राज्याच्या ग्रामीण भागात थंडीचा कडाका प्रचंड वाढला असून काही जिह्यांत 4 ते 5 अंश किमान तापमान नोंद होत आहे. निफाडमध्ये सलग तिसऱया दिवशी नीचांकी 5.6 तापमान नोंद झाले.