आपल्या जादुई तबला वादनाने तमाम संगीतप्रेमींना अलौकिक जगाची सफर घडवणारा तबल्याचा सुपरस्टार झाकीर हुसेन यांच्या जीवन मैफलीची आज अखेर झाली. झाकीर यांनी 73 व्या वर्षी सॅन प्रॅन्सिस्को येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तालाचे आवर्तन समेवर येण्याआधी अचानक थांबले. ‘ग्लोबल म्युझिक आयकॉन’ असलेल्या झाकीर यांच्या निधनाचे वृत्त वाऱयासारखे जगाच्या कानाकोपऱयात पसरले आणि तमाम चाहत्यांचा हृदयाचा ठोका चुकला. तालसम्राट पृथ्वीवरील कानसेनांना तृप्त करून स्वर्गातील तानसेनांना तृप्त करण्यासाठी मार्गस्थ झाला. ‘का उस्ताद का?’ अशी हळहळ चाहत्यांनी व्यक्त केली.
झाकीर हुसेन यांना हृदयाशी संबंधित समस्या जाणवू लागल्याने गेल्या आठवडय़ात सॅन प्रॅन्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली होती. झाकीर यांची प्रकृती सुधारावी म्हणून जगभरातील चाहते प्रार्थना करत होते. दुर्दैवाने सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ते इडियोपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसने ग्रस्त होते. अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार त्यांनी सायंकाळी 4 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी कथ्थक नृत्यांगना अँटोनिया मिनेकोला, मुली अनिसा कुरेशी आणि इसाबेला कुरेशी, भाऊ तौफिक कुरेशी, फजल कुरेशी आणि जगभरात विखुरलेला शिष्य परिवार आहे.
झाकीर यांच्या पार्थिवावर सॅन प्रॅन्सिस्को येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तिथे त्यांना दफन करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांचे भाऊ अमेरिकेसाठी रवाना झाले आहेत.
1988 पद्मश्री
2022 पद्मभूषण
2023 पद्मविभूषण
पाच ग्रॅमी पुरस्कार
1992
प्लेनट ड्रम अल्बमसाठी सर्वोत्तम जागतिक संगीताचा ग्रॅमी पुरस्कार
2009
ग्लोबल ड्रम प्रोजेक्टसाठी पंटेंपरेरी वर्ल्ड म्युझिक
अल्बमचा ग्रॅमी पुरस्कार
2024
तीन वेगवेगळय़ा
संगीत अल्बमसाठी
तीन ग्रॅमी पुरस्कार
वाह उस्ताद…
झाकीर हुसेन यांनी तबला वादनाला जागतिक स्तरावर कीर्ती मिळवून दिली. ते पंचप्राण तल्लीन होऊन तबल्यावर थाप देत. त्यामुळेच श्रोत्यांच्या मुखातून ‘वाह उस्ताद’ ही दाद निघायची. तबल्याचा ठेका, द्रुत लयीत जुगलबंदीचा शेवट करताना मानेला झटका देत लयीत डोलणारे डोईवरचे केस, अशी तबलानवाजांची प्रतिमा वर्षानुवर्षे रसिक मनावर ठसली होती.