कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) करावा, अशी मागणी करणारी याचिका त्यांची सून स्मिता पानसरे यांनी केली आहे. 2015 मध्ये ही याचिका दाखल झाली. सोमवारी सुनावणी पूर्ण करून उच्च न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवला.
तुम्ही केलेल्या आरोपांचा दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सखोल तपास केला आहे. याचा अजून तपास सुरू आहे. एटीएस आपले काम करत आहे. त्यामुळे या याचिकेवरील निर्णय आम्ही राखून ठेवत आहोत, असे न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाथा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
सीलबंद अहवाल सादर
तपासाचा सीलबंद अहवाल एटीएसने न्यायालयात सादर केला. दोन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. तपासात अजून काहीजणांची नावे समोर आली आहेत. तपास सुरू असल्याने आता आम्ही ही नावे जाहीर करू शकत नाही. भविष्यात याबाबत कारवाईची शक्यता आहे. त्यामुळेच आम्ही तपास बंद केलेला नाही, असे वरिष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी न्यायालयाला सांगितले.
पारदर्शक तपासासाठी याचिका
गोविंद पानसरे यांची 16 फेब्रुवारी 2015 मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हिंदू संघटनेने ही हत्या केल्याचा आरोप झाला. या तपासासाठी एसआयटी नेमावी यासाठी सून स्मिता पानसरे यांनी न्यायालयाचे दार ठोठावले. एटीएसने याचा तपास करून वीरेंद्र तावडेसह अन्य आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.