लक्षवेधक वृत्त – 2025 मध्ये 14 दिवस शेअर बाजार बंद

2025 या नव्या वर्षात तब्बल 14 दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे. पुढील वर्षात कोणकोणत्या दिवशी शेअर बाजाराला सुट्टी राहणार आहे, याची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. महाशिवरात्री, होळी, रमजान ईद, महावीर जयंती, डॉ. आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य दिन, गणेश चतुर्थी, दसरा, लक्ष्मी पूजन, दिवाळी (बलिप्रतिपदा), गुरुनानक जयंती, ख्रिसमस या सणांचा समावेश आहे.

आयर्लंडमधील इस्रायलचे दूतावास बंद

इस्रायलने आपले आयर्लंडमधील दूतावास बंद करत असल्याचे जाहीर केले. आयर्लंडवर दुटप्पीपणा आणि इस्रायलविरोधी धोरणाचा आरोप करत इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गिडॉन सार यांनी ही घोषणा केली. आयर्लंडने पॅलेस्टाईनला वेगळे राज्य म्हणून मान्यता दिल्यानंतर इस्रायलने हा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेने इस्रायलविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाखल केलेल्या नरसंहाराच्या खटल्यालाही आयर्लंडने पाठिंबा दिला होता.

224 धरणे 100 वर्षांहून अधिक जुनी

देशातील तब्बल 1 हजार 65 मोठी धरणे 50 ते 100 वर्षे जुनी असून 224 धरणे 100 वर्षांहून अधिक जुनी असल्याची माहिती जलशक्ती मंत्रालयाने दिली आहे, तर एकूण 6 हजार 138 धरणांचे बांधकाम पूर्ण झाले असून 143 धरणांचे बांधकाम सुरू असल्याचेही सांगण्यात आले. जलशक्ती राज्यमंत्री भूषण चौधरी यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. देशभरातील 19 राज्यांतील 736 धरणांचे पुनर्वसन करण्यात येत असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

अर्चना पुरन सिंग यांचे यूटय़ूब चॅनेल हॅक

अभिनेत्री आणि ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मुळे चर्चेत असलेल्या अर्चना पुरन सिंग यांनी यूटय़ूबवर पदार्पण केले. परंतु नवे यूटय़ूब चॅनेल लाँच केले आणि अवघ्या तासाभरात ते अज्ञात व्यक्तींकडून हॅक करण्यात आले आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ पोस्ट करत अर्चना यांनी ही माहिती दिली. मी कालच एक नवीन यूटय़ूब चॅनल लाँच केले. परंतु रात्री दोनच्या सुमारास माझे अकाऊंट हॅक करण्यात आले. माझी यूटय़ूबची टीम अकाऊंट पुन्हा चालू करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही अर्चना यांनी म्हटले आहे.

सीआरपीएफमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) मधील पशुवैद्यकीय पदांसाठीच्या रिक्त जागा भरल्या जात आहेत. उमेदवाराला 6 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करता येऊ शकतो. ही भरती एनडीआरएफच्या पाचव्या आणि 10 व्या बटालियनसाठी केली जात आहे. निवड झालेल्या उमेदवाराला दरमहिना 75 हजार रुपये पगार मिळणार आहे. याशिवाय त्यांना पीएफ, पेन्शन, ग्रॅच्युइटी अशा सर्व सुविधाही मिळतील. अधिक माहिती सीआरपीएफच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.

अमेरिकेत हिंदुस्थानी विद्यार्थिनीचा मृत्यू

अमेरिकेत हिंदुस्थानी विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू झाला असून अन्य दोन जण जखमी झाले. अमेरिकेच्या मेम्फिस परिसरात ही घटना घडली. मृत झालेल्या विद्यार्थिनीचे नाव नागा श्री वंदना परिमाला असून ती आंध्र प्रदेशाच्या गुंटूर जिह्यातील रहिवासी आहे. वंदना 2022 पासून अमेरिकेत उच्च शिक्षण घेत होती. ती मेम्फिस विद्यापीठात मास्टर ऑफ सायन्सचे शिक्षण घेत होती, तर अपघातात पवन आणि निकीत हे दोघे जण जखमी झाले. या दोघांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.