मध्य रेल्वेने मिळवले जबरदस्त उत्पन्न; नोव्हेंबरपर्यंत प्रवासी भाड्यातून 4,966 कोटींची कमाई

मध्य रेल्वेने यंदाच्या आर्थिक वर्षात नोव्हेंबर 2024 पर्यंत प्रवासी वाहतूक भाड्यातून उल्लेखनीय कमाई केली आहे. मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षात प्रवासी भाड्यातून नोव्हेंबर 2024 पर्यंत 4,966 कोटी रुपये उत्पन्न मिळवले आहे. गेल्यावर्षी याच काळात मध्य रेल्वेने प्रवासी वाहतूकीतून 4,699 कोटी रुपये मिळविले होते. गेल्या वर्षींच्या तुलनेत या वर्षात मध्ये रेल्वेच्या प्रवासी भाड्याच्या उत्पन्नात 5.68 टक्क्यांची वाढ झाली आहे.

मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षात नोव्हेंबर-2024 पर्यंत 106.4 कोटी प्रवाशांची वाहतूक केली आहे. गेल्या वर्षी याच काळात मध्य रेल्वेने 103.9 कोटी प्रवाशांची वाहतूक केली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत प्रवासी वाहतूकीत 2.35 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्ये या आर्थिक वर्षात 12.7 कोटी गैर – उपनगरीय प्रवाशांचा समावेश आहे. गेल्या वर्षी 12.1 कोटी गैर उपनगरीय प्रवाशांनी वाहतूक केली होती. या आकडेवारीत प्रवासी संख्येत 5.61 टक्क्यांची वाढ झाली आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षात नोव्हेंबर 2024 पर्यंत 93.6 कोटी उपनगरीय प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास केला आहे. गेल्यावर्षी याच काळात 91.8 कोटी उपनगरीय प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यामुळे मध्य रेल्वेवर प्रवासी संख्याही वाढली असून मध्य रेल्वेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.