जिंदाल पोर्ट कंपनीत झालेल्या वायुगळतीमुळे बाधित झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा रूग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले होते. त्यापैकी 19 विद्यार्थ्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज दुपारनंतर दोन प्रोढांनाही त्रास होऊ लागला, त्यांनाही खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्घटना घडल्यानंतर 72 तासांनी त्याचे विपरीत परिणाम दिसू लागले आहेत.
12 डिसेंबर रोजी जिंदाल पोर्ट कंपनीत एलपीजी वायुगळती झाली. कंपनीच्या शेजारीच असलेल्या माध्यमिक विद्यामंदिर जयगड शाळेतील 68 विद्यार्थ्यांना त्रास झाला. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसांनी या विद्यार्थ्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
उपचार घेऊन विद्यार्थी घरी परतल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला. काही विद्यार्थ्यांच्या छातीत दुखू लागले, तर काहींच्या पोटात दुखत होते. अशा 19 विद्यार्थ्यांना पुन्हा खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 72 तासानंतर प्रोढांनाही त्रास होऊ लागला त्यांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आमच्या जीवाशी खेळणार असला तर कंपनी बंद करा – महिलांची संताप
खासगी रूग्णालयाच्या आवारात पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालक अफसाना सांगरे यांनी सांगितले की, आमच्या मुलांना पुन्हा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे आम्ही मुलांना खासगी रूग्णालयात दाखल केले. भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत याकरिता कंपनीच बंद करावी. माधूरी गोताड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, जिल्हा रूग्णालयात आमच्या मुलांवर उपचारच झाले नाहीत फक्त सलाईन लावले त्यामुळे मुलांना होणारा त्रास वाढला.प्रशासना जी समिती बनवत आहे. त्यामध्ये बाधित मुलांच्या पालकांना घ्या. बाहेरचे कुणी नको, अशी मागणी त्यांनी केली .प्रियांका जैन यांनी सांगितले की, माझ्या पतीलाही त्रास होऊ लागल्याने त्यांनाही रूग्णालयात दाखल गेले आहे. अशा घटना घडणार असतील तर कंपनीचं बंद करावी.