कुर्ल्याच्या एलबीएस रोडवर सोमवारी रात्री भरधाव ‘बेस्ट’ बसने 50 जणांना चिरडल्याने आठ जणांचा बळी गेला आहे. या अपघातानंतर खाजगी बेस्ट बसच्या सुरक्षांबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या खाजगी बसेसमुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे बेस्ट बसचे खाजगीकरण थांबवा अशी मागणी करणारे पत्र बेस्ट कामगार सेनेतर्फे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिले आहे. तसेच याबाबत तातडीने तोडगा काढण्यासाठी महापालिका आय़ुक्तांनी भेटीची वेळ द्यावी अन्यथा आम्ही तुमच्या दालनात येऊन आंदोलन करू, असा इशारा देखील बेस्ट कामगार सेनेतर्फे देण्यात आला आहे.
”9 डिसेंबर रोजी मुंबई कुर्ला येथे झालेल्या बेस्टच्या खाजगी बसमुळे भीषण अपघात होऊन त्यात 8 जण मृत्युमुखी झाले आणि 48 जण जखमी झाले आहेत. बेस्टमध्ये यापूर्वी देखील गेल्या चार वर्षात हया खाजगी बसमुळे मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. खाजगी बसेसला वरचेवर प्रवासादरम्यान रस्त्यावर आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे आशिया खंडात नावलौकिक असलेल्या बेस्टची जनमानसात प्रतिमा मलिन होत आहे. खाजगी कंत्राटदार कंपनी कडून बसेसची योग्य प्रकारे देखभाल, दुरूस्ती करण्यात येत नाही. तसेंच कंत्राटी बसचालक कर्मचा-यांना योग्य प्रशिक्षण देण्यात येत नाही. त्यामुळे मुंबईकर जनतेला सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. तुटपुंज्या वेतनामुळे कंत्राटी कर्मचारी एका दिवशी दोन-तीन पाळ्यांमध्ये काम करतात. त्यांना काययाचे बंधन नाही. बिनदिक्कतपणे मद्यपान करून बस चालविणे यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे निष्पाप मुंबईकर जनतेला जीव गमवावा लागत आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. बेस्टला पुन्हा गतवैभव प्राप्त करून यावयाचे असेल तर बेस्टचे खाजगीकरण तात्काळ थांबविले पाहिजे. बेस्टने स्वमालकीच्या बसगाडया खरेदी करून मुंबईकरांना सुरक्षित प्रवासी सेवा पुरविणे महापालिकेचे कर्तव्य व जबाबदारी आहे. यापूर्वी देखील मी आपणास जवळपास आठ पत्र दिली होती. आपण आम्हांला एकदाही चर्चेसाठी वेळ दिली नाही. आपण निःपक्षपातीपणे काम करून यावर तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे. आपण यावर तातडीने तोडगा काढण्याच्या दृष्टीने आम्हाला भेट नाकारल्यास आम्हांला आपल्या दालनात येऊन आंदोलन करावे लागेल. यापुढे जर बेस्टच्या खाजगी बसमुळे कोणाचे अपघात झाले तर त्याची संपुर्ण जबाबदारी ही आपली व मुंबई महापालिका तसेच राज्यसरकारची राहील, असा इशारा बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी या पत्रातून दिला आहे.