टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या गॅबा कसोटीमधील तिसऱ्या दिवशी पावसाच्या लंपडावामुळे संपूर्ण खेळ होऊ शकला नाही. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाच्या फलंदाजांनी चाहत्यांची निराशा केली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी कहर बरसवणारी गोलंदाजी केल्यामुळे दिवसा अखेर टीम इंडियाची चार बाद 51 धावा अशी केविलवाणी अवस्था झाली आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेड (152 धावा) आणि स्मिथ (101 धावा) यांची शतकीय खेळी आणि त्यानंतर अॅलेक्स कॅरी याने केलेल्या 70 धावा संघाला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. जसप्रीत बुमराने सर्वाधिक 6 विकेट घेतल्या तर सिराजने 2 आणि आकाश दीप व जडेजा यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाने उभा केलेला 445 धावांचा डोंगर भेदून काढण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाच्या फलंदाजांचा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांपुढे निभाव लागला नाही. सलामीला आलेला यशस्वी अवघ्या 4 या धावसंख्येवर मिचेल स्टार्कचा शिखार ठरला. त्यानंतर आलेला शुभमन गिल (1 धाव), विराट कोहली (3 धावा) आणि ऋषभ पंत (9 धावा) यांना गोलंदाजांनी आल्यापावली परत धाडले. त्यामुळे टीम इंडियाची 44 धावांवर 4 विकेट अशी केविलवाणी अवस्था झाली आहे. सलामीला आलेला के.एल. राहुल 33 धावा आणि कर्णधार रोहित शर्मा 0 या धावसंख्येवर नाबाद खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 2 आणि हॅझलवूड व कमिंन्स याने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडिया या सामन्यात बॅकफुटवर गेली असन संघावर फॉलोऑनचे संकट निर्माण झाले आहे. टीम इंडियाला फॉलोऑन पासून वाचण्यासाठी 195 धावांची गरज आहे. त्या बरोबर टीम इंडियाकडे अजूनही 16 विकेट (पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात 10) शेष आहेत. या सामन्यातील 196 षटके अद्याप शिल्लक आहेत. परंतु पुढील दोन दिवस गॅबामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सामना अनिर्णीत राहण्याची शक्यता आहे.