मिंधे गटातल्या 11 आमदारांनी नागपुरात मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पण या सर्व आमदारांकडून एकनाथ शिंदेंनी अडीच वर्षात मंत्रिपदाचा राजीनामा देणार असे लिहून घेतले आहे. मंत्री शंभुराज देसाई यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एकनाथ शिंदे यांना अधिकृतरित्या आमदारांना मंत्रिपदावरून काढता येईल यासाठी ही प्रतिज्ञापत्रं घेतल्याचे देसाई यांनी सांगितले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारी करून बाहेर पडलेल्या मिंधे गटात सारे काही आलबेल नाही. मिंधे गटात गेलेले सर्व नेते फक्त सत्ता आणि खुर्चीसाठीच उद्धव ठाकरेंना सोडून गेले होते यावर आता एक प्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे.
हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे. मिंधेंच्या एका जवळच्या वक्तीने सांगितले की, मिंधेंसोबत आलेले आमदार ना एकनाथ शिंदे यांच्याशी निष्ठावान आहेत ना ते कुठल्या विचारसरणीशी बांधील आहेत. त्यांना फक्त सत्ता हवी आहे, त्यामुळे सत्तेचे योग्य वाटप होणे गरजेचे आहे असे या व्यक्तीने सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि अब्दूल सत्तार यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे मिंधेंचे हे तीन आमदार नाराज आहेत. दुसरीकडे मिंधेंचे आमदार संजय राठोड यांची पुन्हा मंत्रिपदी वर्णी लागली आहे. राठोड यांच्यांवर गंभीर आरोप असतानाही त्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना राठोड यांच्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोप केले होते. पण देवेंद्र फडणवीस आणि राठोड यांची मैत्री असल्याने फडणवीस यांनी राठोड यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर दाखवला अशी माहिती सुत्रांनी दिली.
तानाजी सावंत यांच्याबद्दल अनेक आयएएस अधिकाऱ्यांची तक्रार होती. अधिकाऱ्यांनी सावंत यांना चांगलाच विरोध केला होता. सावंत जेव्हा आरोग्य मंत्री होते तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य सचिव मिलिंद म्हैसकर यांना विभाग चालवण्यासाठी मोकळा हात दिला होता असेही या वृत्तात म्हटले आहे.