बीड आणि परभणीत काय घडलं याचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे – सुप्रिया सुळे

बीड आणि परभणीमध्ये झालेल्या घटना दुर्दैवी आहेत. महाराष्ट्राला तीन आठवड्यांपासून गृहमंत्री नाहीत. माझी अपेक्षा होती की एवढं मोठं बहुमत जर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने यांना दिलं आहे तर त्यांनी कामाला लागायला हवं होतं. असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस सरकारवर केला आहे.

यावर सविस्तर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, परभणी रेल्वे स्थानकाबाहेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची काही दिवसांपूर्वी विटंबना झाली होती. यानंतर उफाळेल्या हिंसाचारप्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आले होते. यातील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीतील मृत्यू झाला आहे. तर बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची जुन्या वादातून अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणामध्ये नेमकं काय झालं, याचे उत्तरं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांनी याआधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे बीड आणि परभणीमधील विषय त्यांनी गांभीर्याने घ्यावेत. परभणीतील न्यायालयीन कोठडीतल्या मृत्यूची गंभीर तपासणी झाली आहे. राज्याला आणि देशाला पारदर्शकपणे कळलं पाहिजे, परभणीत तरुणाचा मृत्यू झाला कसा. या आठवड्यात दोन-तीन घटना झाल्या आहेत. बीड आणि परभणीतील घटना घडलेल्या असताना राज्याला गृहमंत्री नाही. सरकार होऊन तीन आठवडे झाले आहेत. महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने त्यांना बहुमताने विजयी केलं आहे. त्यामुळे मला अपेक्षा होती, ते आतापर्यंत कामाला लागले असते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

खातेवाटप का झालेलं नाही कल्पना नाही. मात्र तीन आठवडे पूर्ण होऊनही आधी मुख्यमंत्री निवडीसाठी वेळ, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ आणि आता अजून खातेवाटप नाही. भाजपा अभिमानाने म्हणायचा की आम्ही पार्टी विथ डिफरन्स आहोत. मात्र आता महाराष्ट्रात असं का होतं आहे? हे महाराष्ट्राला शोभणारं आणि अस्वस्थ करणारं आहे. जनतेने जो कौल दिला तो विश्वासाच्या नात्याने दिला आहे. आता काम कधी सुरु होणार या प्रतीक्षेत महाराष्ट्र आहे आणि मीदेखील आहे असेही सुप्रिया सुळे यांनी बोलताना सांगितले आहे.

सुप्रिया  सुळे बोलताना म्हणाल्या की, परभणी किंवा बीडमध्ये घटना घडत असताना राज्याचा एकही प्रतिनीधी त्या ठिकाणी गेला नाही. तसेच लोकांना शांततेचं आवाहन केलं नाही. सरकार कुठेतरी संवैधनशीलपणा दाखवत नाही, असं वाटतं का? या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सरकार आताच झालं आहे, त्यामुळे मला सरकारवर टीका करायची इच्छा नाही. कारण राज्याच्या जनतेने त्यांना बहुमताने विजयी केलं आहे. पण दु:ख एकाच गोष्टीचं वाटतं की, मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावरून मी त्यांचे रुसवे-फुगवे बघत आहे. पण सरकारमध्ये किंवा आपण मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी निवडून येतो. त्यामुळे अशी परिस्थिती असताना बहुमत असतानाही तुम्ही कामाला लागायची ऐवजी रुसवे-फुगवे करत बसला आहात. मंत्री असो किंवा नसो, आपण लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहोत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

छगन भुजबळ यांना मंत्री का केलं गेलं नाही? हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मात्र छगन भुजबळ आमच्याबरोबर असेपर्यंत आदरणीय शरद पवार साहेब यांच्या बरोबरीनेच छगन भुजबळ यांचा मान ठेवण्यात आला आहे. छगन भुजबळ यांची खुर्चीही आदरणीय शरद पवार साहेबांच्या शेजारीच असे. प्रत्येक वेळी कुठलीही जबाबदारी देण्याचा विषय असे तेव्हा छगन भुजबळ यांचंच नाव पुढे असायचं. आदरणीय शरद पवार साहेब यांच्यासोबत छगन भुजबळ ताकदीने उभे राहिले हे मी कधीच विसरणार नाही. मागच्या दीड-दोन वर्षांत ज्या घटना घडल्या त्याला अनेक कारणं आहेत. मला त्यात आता पडायचं नाही. मात्र हा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. असेही सुप्रिया सुळे यांनी बोलताना सांगितले आहे.