महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रीमंडळाने शपथ घेतली. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मंत्र्यांच्या कामाचे ऑडिट होणार असल्याचे सांगितले आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप व देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोला लगावला आहे. ”मोदींचा झीरो टॉलरन्स जर देवेंद्रजींनी महाराष्ट्रात राबवला तर 90 टक्के मंत्रीमंडळ रिकामं होईल, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
”काही लोकांचे दोन वर्षांपासून टांगलेले कोट अंगावर चढले. अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला आहे असे समजते. यांनी सहा सहा महिन्याचा फॉर्म्युला केला तर सगळ्यांनाच मंत्रीपद मिळतील. पण याचा अर्थ स्पष्ट आहे की आमच्याकडून सोडून गेले आहेत ते सत्ता पद पैसाच्या मोहासाठीसाठी आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, अकार्यक्षमतेचे आरोप होते त्यांना वगळलं आहे. छगन भुजबळांना वगळण्यात जातीय राजकारण आहे. पण भुजबळ यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याने ज्या प्रकारे शरद पवारांची साथ सोडली ते सर्वांना क्लेशदायक होतं. ज्याला त्याला आपल्या कर्माची फळं राजकारणात मिळत असतात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
मंत्र्यांच्या कामगिरीचं ऑडिट होणार यावर बोलताना संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे, ”देवेंद्रजी हे नरेंद्रजींचे अंधभक्त आहेत. केंद्रात नरेंद्रजी जुमलेबाजी करत असतात तसे त्यांचे चेलेही खाली करत असतात. भ्रष्टाचाराबाबत झीरो टॉलरन्स ही नरेंद्रजींची घोषणा आहे. हा झीरो टॉलरन्स जर महाराष्ट्रात देवेंद्रजींनी राबवला तर त्यांचं 90 टक्के मंत्रीमंडळ रिकामं होईलनरेंद्र जी दिल्लीत सगळ्या भ्रष्टाचारांना दिल्लीत सोबत घेऊन बसले आहेत. तसेच देवंद्रजी ताकदीचे, हेविवेट भ्रष्टाचारी आपल्यासोबत घेऊन बसले आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.