चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा कामाला अखेर मुहूर्त सापडला आहे. तसेच शंकरवाडी-मुरादपूर वाशिष्ठी नदी तीरावरील नलावडा बंधारा वाहून गेल्याने दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूरस्थितीतून मार्ग काढण्यासाठी बंधाऱ्याच्या ठिकाणी पूर संरक्षक भिंतीसाठी 20 कोटी 21 लाख 19 हजार 300 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
शहरामध्ये वाशिष्ठी नदीच्या काठावर शंकरवाडी-मुरादपूर या दोन वाड्यांमध्ये कमी उंचीचा सखल भाग आहे. हे ठिकाण वाशिष्ठी नदीवरील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या खालील बाजूस सुमारे 1 कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणी वाशिष्ठी नदीच्या पात्रास वळण तयार झाले आहे. नदीच्या वळणाच्या आतील बाजूस गाळ व वाळू साठलेली असून वळणाची बाहेरील बाजू दरवर्षी पुराच्या पाण्याने खचत आहे.
या नदीच्या वळणावर संरक्षक भिंतीचे (नलावडा बंधारा) जुने दगडी बांधकाम पूर्वी केले होते, परंतु 2005च्या पुरामुळे बंधाऱ्याचे बांधकाम वाहून गेले आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात पुराचे पाणी शिरून वित्तहानी होत आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात साडेनऊ कोटी, त्यानंतर पाच कोटी निधी उपलब्ध झालेला आहे. या वर्षी गाळ उपसा वाशिष्ठी नदीत राहिलेल्या भागात केला जाणार आहे. नाम फाऊंडेशनबरोबर करार झालेला असला तरी सध्या जलसंपदाच्या यांत्रिकी विभागातर्फे मशिनरी लावली जाणार आहे.
…तर घरांना धोका उद्भवणार नाही!
शंकरवाडी येथून वाशिष्ठी नदीचे पाणी चिपळूण शहरामध्ये सांस्कृतिक केंद्र, स्मशान शेड, वाणी आळीमार्गे शिवनदीला मिळते. हे पाणी शंकरवाडी येथे अडवल्यास या भागातील घरांना धोका पोहोचणार नाही. तसेच वाशिष्ठी नदीचे पाणी शिवनदीकडे जाताना आजूबाजूला पसरल्याने शहरातील जी पाण्याची पातळी वाढते त्यास अटकाव होणार आहे. दरम्यान, मध्यंतरी विधानसभा निवडणुकीमुळे थांबलेली विकासकात्मक कामे आता पुन्हा सुरू झाली असून मंजूर झालेल्या कामांपैकी चिपळूण शहरातील पहिल्या नलावडा बंधारा कामाचा शुभारंभ लवकरच आमदार निकम यांच्या हस्ते होत आहे. यावेळी पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या वर्षी पावसाळा संपून तीन महिने उलटायला आले तरी वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाला सुरुवात झालेली नाही.