महायुतीचे सरकार खुनी, अत्याचारी आणि शेतकरीविरोधी; विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून ईव्हीएमच्या जोरावर सत्तेवर आलेले महायुतीचे सरकार खुनी, अत्याचारी आणि शेतकरीविरोधी आहे, असा आरोप करत महाविकास आघाडीने हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घातला.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या, सोमवारपासून नागपूर येथे सुरू होत आहे. तत्पूर्वी आज दुपारी नागपूरच्या रविभवन येथे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला दानवे यांच्यासह शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जितेंद्र आव्हाड, शिवसेना आमदार महेश सावंत, ज. मो.अभ्यंकर आदी उपस्थित होते. सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

हे सरकार दिवसाढवळय़ा खून करणारे-अंबादास दानवे

महायुतीचे सरकार शेतकरीविरोधी, दलितांवर अत्याचार करणारे आणि दिवसाढवळय़ा खून करणारे सरकार असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी केला. सोयाबीन, कापसाला भाव न देणारे, दुधाचे भाव घसरवणारे आणि शेतकऱयांची दयनीय अवस्था करणारे हे सरकार आहे, असा जोरदार हल्ला त्यांनी केला.

बेरोजगारांना रस्त्यावर नागडे फिरण्याची वेळ – वडेट्टीवार

महाराष्ट्राची अधोगती झाली आहे, महाराष्ट्र कर्जबाजारी झाला आहे, शेतकरी रोज आत्महत्या करतोय, उद्योगधंदे बाहेर पळाल्याने महाराष्ट्रातील बेरोजगावर रस्त्यावर नागडे फिरण्याची वेळ आली आहे. राज्यात गुंतवणूक येत नाही. गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्राबाबत अनास्थ निर्माण झाली आहे. असे असताना दुसरीकडे पाठ थोपटण्याचे महायुती सरकारचे काम सुरू झाले, अशी टीका यावेळी काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली.

नवीन सरकार आल्यावर, विदर्भातील मुख्यमंत्री झाल्यावर तीन आठवडय़ांचे अधिवेशन असेल, त्यात विदर्भाचे प्रलंबित प्रश्न मांडले जातील अशी विदर्भातील जनतेची अपेक्षा होती, परंतु कमी कालावधीसाठी अधिवेशन ठेवून महायुती सरकारने वैदर्भीय जनतेचा अपेक्षाभंग केला, असे वडेट्टीवार म्हणाले. बीडमध्ये सरपंचाचा खून करणा ऱ्या आरोपीला राजकीय आश्रय देणाऱयांना मंत्री केले जाते, त्यामुळे या खुनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

शेतकरी कर्जमाफीची भूमिका स्पष्ट करा – नाना पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी शेतकऱयांच्या मुद्दय़ावरून सरकारवर ताशेरे ओढले. सोयाबीन खरेदी केंद्र अजून सुरू झाले नाही याकडे लक्ष वेधतानाच, शेतकरी कर्जमाफीची भूमिका सरकारने स्पष्ट करावी, अशी मागणी पटोले यांनी केली. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्येप्रकरणीही त्यांनी सरकारवर टीका केली. देशमुख यांची हत्या करून त्यांचे प्रेत नासवण्याचे काम हल्लेखोरांनी केले, मात्र अद्याप त्यांच्यावर सरकारने कठोर कारवाई केलेली नाही, असा आरोप पटोले यांनी केला.

थोडे असलो म्हणून काय, जनतेचे प्रश्न ताकदीने मांडणार

विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या कमी असली म्हणून काय झाले, महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आणि समस्या दोन्ही सभागृहांत ताकदीने आणि प्रभावीपणे मांडू, अशी ग्वाही यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली.

कोठडीत तरुणाचा मृत्यू होतो आणि फडणवीस मिरवणुकीत दंग

परभणी येथे संविधानाची विटंबना झाल्यावर तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा कोठडीत मृत्यू झाला. राज्यात अशा घटना घडत असताना मुख्यमंत्री फडणवीस मिरवणुकीत गुंतले आहेत, असा संताप दानवे यांनी व्यक्त केला.