मणिपूर अस्थिरच; 2 मजुरांची गोळ्या घालून हत्या, दहशतवाद्यांशी चकमक; 1 ठार, 6 जणांना अटक

मणिपूरमध्ये शनिवारी सायंकाळी काकचिंगमध्ये दहशतवाद्यांनी बिहारच्या दोन मजुरांची गोळ्या घालून हत्या केली. दोघेही काम आटोपून सायकलवरून घरी परतत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुसरीकडे मणिपूरच्या थौबलमध्ये एका दहशतवादी गटाची पोलिसांशी चकमक झाली. यात एकाचा मृत्यू झाला तर सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. या घटनांमुळे मणिपूर पुन्हा एकदा अस्थिर असल्याचेच समोर आले आहे.

सुनालाल कुमार (18) आणि दशरथ कुमार (17) अशी मृत्युमुखी पडलेल्या मजुरांची नावे आहेत. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. काही दिवसांपूर्वी पोलीस लायब्ररीतून ही शस्त्रे लुटण्यात आली होती. पोलिसांना सलुंगफाम भागात दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाली होती. सलुंगफाममध्ये गस्त घालत असताना पोलिसांनी एक कार थांबवली, त्यात सात दहशतवादी होते. कार थांबवण्याऐवजी त्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला.

पोलिसांकडून चोख प्रत्युत्तर

गोळीबाराला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. गोळीबारात एक दहशतवादी गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, लैश्राम प्रेम (18) असे या दहशतवाद्याचे नाव आहे. इतर सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दहशतवाद्यांकडून एक इन्सास रायफल, एक एसएलआर, एक 0.303 रायफल आणि एक अमाघ कार्बाईनसह 137 राऊंड दारूगोळा जप्त करण्यात आला.

दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेली शस्त्रे पोलिसांचीच असल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी शस्त्रागारातून ती लुटण्यात आली होती. मृत दहशतवादी प्रेम हा ऑगस्टमध्ये बेपत्ता असल्याची त्याच्या कुटुंबीयांनी तक्रार केली होती. दरम्यान, प्रेमच्या मृत्यूप्रकरणी थौबल पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने करण्यात आली. तो दहशतवादी नसल्याचा दावा करण्यात आला.