महायुतीला ईव्हीएमने, निवडणूक आयोगाने बहुमत दिल्यानंतरही मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला दोन आठवडे लागले होते. त्यानंतर मंत्रिपदासाठी गद्दार गँगमध्ये तुला काय मिळणार, मला काय मिळणार, कोणते मंत्रिपद मिळणार, खायला काय मिळणार, अशी भांडणे सुरू आहेत. हा स्वार्थीपणा, हावरटपणा लोकांसमोर आला आहे. हे विचार महाराष्ट्रासाठी भयानक आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आजच्या मंत्रिमंडळ विस्तारावर दिली.
आदित्य ठाकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्रिपदासाठी महायुतीमध्ये सुरू असलेल्या भांडणावर टीका केली. बहुमत मिळूनही खात्यांसाठी वाद सुरू आहेत, हे फार चुकीचे आहे. महाराष्ट्राचे चित्र इतके भयानक कधीही नव्हते आणि नसावे अशीच आपली ईश्वरचरणी प्रार्थना आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. मंत्रिपदासाठी कुणी जॅकेट शिवून तयार असते तर कुणी प्रार्थना करत असते. हे सगळे ठीक आहे, पण बहुमत मिळाल्यानंतर स्वार्थीपणा बाजूला ठेवून तातडीने लोकसेवा सुरू करायला हवी होती, असे म्हणत त्यांनी मिंधे गटाच्या भरत गोगावले यांच्यावरही निशाणा साधला.
जिथे जिथे भाजप, तिथे हिंदू खतरे मे
दादर येथील हनुमान मंदिर वादावरूनही यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, ‘हृदयात राम आणि हाताला काम हे शिवसेनेचे हिंदुत्व आहे. स्वतःच्या धर्माचा पुरस्कार करायला दुसऱ्याच्या धर्माचा तिरस्कार करण्याची गरज नसते. भाजप म्हणते हिंदू खतरे मे है, पण कालच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचा बुरखा फाडला आहे. हिंदूंचा वापर भाजप फक्त निवडणुकीत करते. बाकी त्यांना काहीच पडले नाही. वाराणसी असो, कॉरिडोरच्या नावाखाली असो वा महाराष्ट्रातील हनुमानाचे मंदिर असो जास्तीत जास्त मंदिरे ही भाजपच्याच राजवटीत पाडली गेली आहेत. म्हणजे भाजप जिथे जिथे आहे तिथे हिंदू खतरे मे आहे,’ असा जोरदार हल्ला आदित्य ठाकरे यांनी केला.
भाजप–काँग्रेसने सावरकरांच्या विषयावर भांडून तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत का?
भाजप असो वा काँग्रेस दोन्ही मोठे पक्ष आहेत. राष्ट्रीय पक्ष आहेत. त्यांना मते मिळाली आहेत ती वर्तमान आणि भविष्यावर बोलण्यासाठी मिळालेली आहेत. दोन्ही पक्षांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय केले, नेहरूंनी काय केले, 50 वर्षांपूर्वी-शंभर वर्षांपूर्वी काय झाले हा विषय थोडा बाजूला ठेवावा. कारण यावर भांडून तरुणांना नोकऱ्या मिळणार नाहीत किंवा महागाई कमी होणार नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्या कमी होणार आहेत का, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.
रस्ते घोटाळय़ाची अधिकृत चौकशी सुरू करा!
मिंधे सरकारने रस्ते घोटाळय़ांमध्ये 12 हजार कोटींचा मलिदा लाटला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी या रस्ते घोटाळय़ांची अधिकृत चौकशी करावी अशी विनंतीही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. फडणवीस सरकारची रस्ते घोटाळय़ावर खरोखरच कारवाई करण्याची इच्छा असेल तर त्यांना तत्कालीन घटनाबाह्य मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या कार्यकाळातील मंगलप्रभात लोढा आणि दीपक केसरकर या दोन पालकमंत्र्यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवावे लागेल, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून शिवसेना या रस्ते घोटाळय़ांविरुद्ध आवाज उठवत आहे, परंतु भाजपने त्याची दखल न घेता मिंधे सरकारला पाठीशी घातले, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. मुंबईकरांच्या कष्टाची कमाई, पंत्राटदार आणि राजकारण्यांनी स्वतःच्या खिशात घातली, असेही ते म्हणाले.
भाजपदेखील निकृष्ट रस्त्यांबाबत बोलत आहे आणि एसआयटीची मागणी करत आहे, म्हणजेच मिंधे सरकारने दोन रस्ते घोटाळय़ांत 12 हजार कोटींचा मलिदा लाटला असल्याच्या शिवसेनेच्या आरोपाला दुजोरा दिला आहे, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.