तुमचा निर्धार पक्का असेल तर स्वप्नपूर्तीपासून कुणीही रोखू शकत नाही. मागील दीड वर्षापासून हिंसाचाऱ्याच्या आगीत होरपळणाऱ्या मणिपूरमधील युवकाने हे सिद्ध करून दाखवलेय. ही गोष्ट आहे लेफ्टनंट सेइगौलाल वैहेई यांची. हिंदुस्थानी लष्करात बढती होऊन ते अधिकारी बनले आहेत. त्यांच्या बेथेल गावाला एकेकाळी हिंसाचाराची मोठी झळ बसली. त्याचा फटका लेफ्टनंट सेइगौलाल वैहेई यांनाही बसला. त्यांचे घर पेटवण्यात आले. संपूर्ण कुटुंब दुरावलं. मात्र त्यांनी हिंमत सोडली नाही.
सैन्यदलात अधिकारी म्हणून रुजू झालेले लेफ्टनंट सेइगौलाल वैहेई म्हणाले, मणिपूरच्या हिंसाचारात माझं कुटुंब उद्ध्वस्त झाले. माझे घर जाळले. विधवा आई, पत्नी आणि तीन मुले बेघर झाली. त्यांना एक आठवडा लष्कराच्या छावणीत रहावे लागले. लष्कराने माझ्या कुटुंबाची काळजी घेतली. बेघर आणि अनिश्चित वातावरणात लेफ्टनंट सेइगौलाल वैहेई यांनी कठीण पर्याय निवडला. त्यांनी पत्नी आणि मुलांना मेघालयातील शिलाँग येथे पाठवले, तर आईला मोठ्या भावाकडे डेहराडूनला पाठवले. लेफ्टनंट वैहेई म्हणाले, ज्या ठिकाणी आमचे बालपण गेले तिथे आम्हाला परत जायचे होते. मणिपूरमध्ये शांती हा एकच उपाय आहे. या सर्व परिस्थितीत सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाची मुलाखत मला द्यायची होती. माझी शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली असल्याने मी मुलाखत देऊ शकलो. तो कठीण काळ सोसूनही मी आज अधिकारी झालो.
वैहेई यांच्या वडिलांचे 1990 मध्ये निधन झाले. ते शेतकरी होते. काही वेळेस मजुरीही करायचे. त्यांच्या कुटुंबात कुणी सैन्यदलात नव्हते, पण तीन भावांनी अतोनात मेहनत घेऊन यश मिळवले. लष्करात जाऊन देशसेवा करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. वैहेई यांना गिटार वाजवायला, फुटबॉल खेळायला आवडते.
चारपैकी तीन भाऊ लष्करात
लेफ्टनंट सेइगौलाल वैहेई यांच्या बेथेल गावात अवघी 45 घरे आहेत. या गावात त्यांच्या बालपणाच्या अनंत आठवणी आहेत. लेफ्टनंट वैहेई आपल्या परिवारासाठी व समाजासाठी आशेचा किरण आहेत. सेइगौलाल वैहेई म्हणाले, आमची जमीन आहे. मात्र आता ती आमची आहे की कुणी त्यावर अतिक्रमण केले, हे सांगता येत नाही.