दिल्ली डायरी – दिल्लीत ‘आप’चे एकला चलो रे!

>> नीलेश कुलकर्णी

दिल्ली विधानसभेची निवडणूक स्वबळाबर लढविण्याचा निर्णय ‘आप’ने घेतला आहे. इंडिया आघाडीतील आप व काँग्रेससारखे दोन महत्त्वाचे पक्ष वेगवेगळे निवडणूक लढविणार असतील तर त्याचा फायदा भाजपला होईल. मात्र दुर्दैवाने हे सगळे घडते आहे. दिल्लीसारखे राज्य गमावले तर राजकारणात हाती काहीच उरणार नाही, याची जाणीव असूनही अरविंद केजरीवाल यांनी मोठा धोका पत्करून हिमतीने ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे.

‘शीश महल’ प्रकरणानंतर केजरीवालांची ‘क्रेझ’ कमी झाली आहे. त्यातच त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे दिल्लीकरांच्या मानसिकतेलाही धक्का बसला आहे. केजरीवालांकडचा दलित व मुस्लिम वर्ग मोठय़ा प्रमाणावर काँग्रेसकडे ‘शिफ्ट’ होतो आहे, तर मध्यमवर्गाला भाजपची भुरळ आहे. त्यातच केजरीवाल मुख्यमंत्री नसल्याचा एक परिमाण नाही म्हटला तरी प्रशासन व एकंदरीतच सरकारवर जाणवतो आहे. अशा स्थितीत इंडिया आघाडीतील आप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढणे आत्मघाती ठरू शकते. एकदा का दिल्लीतून ‘केजरीवालांचा झाडू’ साफ झाला की, त्यांचे राजकीय अस्तित्वच संपेल. त्यामुळे केजरीवालांना या वेळी कोणत्याही स्थितीत धोबीपछाड द्यायचीच याची रणनीती महाशक्ती आखत आहे. ‘लाडली बहन’सारख्या योजना या निवडणूक जिंकण्याचा जणू ट्रेण्ड बनल्या आहेत. दिल्लीतही केजरीवालांनी ‘लाडली बहना’चा नारा देत काँग्रेससोबत असलेला ‘भाईचारा’ मात्र संपवला! ‘लाडली बहन’ला 2100 रुपयांच्या मदतीचे आश्वासन केजरीवालांनी दिले आहे. दिल्लीत कॉंग्रेसचे अस्तित्व उरलेले नाही, असा केजरीवालांचा दावा आहे, तर केजरीवालांच्या पक्षाला घरघर लागल्याचा काँग्रेसचा दावा आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंद यादव यांनी दिल्लीत न्याय यात्रा काढली. या यात्रेमुळे दिल्लीकर काँग्रेससोबत कितपत न्याय करतील, हे निकालानंतरच समजेल. मात्र, गलितगात्र काँग्रेसमध्ये या यात्रेने हलचल निर्माण केली हे नक्की. केजरीवालांना दिल्लीचा पेपर या वेळी सोपा नसण्याचे हेही एक कारण आहे. काँग्रेसची एकेकाळी गलितगात्र अवस्था झाल्यामुळे काँग्रेसची व्होट बँक आपकडे शिफ्ट झाली होती. आता तीच व्होट बँक काँग्रेसकडे परत फिरू शकते, अशी स्थिती आहे. त्यात अनेक वर्षे सत्तेत असल्यामुळे केजरीवालांविरोधात निर्माण झालेली ऑण्टिइन्कम्बन्सी. आपच्या सरकारवर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप. केजरीवाल हे निष्कलंक नाहीत, हे नरेटिव्ह सेट करण्यात भाजपला मिळत असलेले यश हे सगळे मुद्दे लक्षात घेता दिल्लीत या वेळी मोठा बदल होण्याची चिन्हे दिसताहेत. मदनलाल खुराणा यांच्या नंतर संपूर्ण दिल्लीला कवेत घेईल इतका मोठा नेता भाजपकडे तयार झाला नाही. त्याचा फटका भाजपला बसलाही. मात्र या वेळी नरेंद्र मोदींचा ‘चेहरा’ पुढे ठेवून निवडणूक लढविण्याची भाजपची रणनीती आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये बेदिली माजली तर त्यामुळे भाजपचे आयतेच फावणार आहे. दिल्ली गमावली तर केजरीवालांचा राष्ट्रीय राजकारणातला ‘रिलेव्हन्स’ संपून जाईल. भाजपला नेमके तेच हवे आहे.

सेलिब्रिटी टीचर

देशाच्या राजकारणात बॉलीवूडचे चमचमते तारेतारका ‘चमकविण्या’चे श्रेय भाजपकडे जाते. आता सगळ्याच पक्षांनी अशी ‘तारका मंडळे’ जमवली आहेत. आता या तारका मंडळात शिक्षण क्षेत्राचीही भर पडली आहे. यूपीएससीचे ‘सेलिब्रिटी टीचर’ आणि मोटिव्हेशनल स्पीकर अवधेश ओझा यांनी ‘आप’चा झाडू हाती घेत आता राजकारणात उडी मारली आहे. आपमध्ये पूर्वी कुमार विश्वास नावाचे ‘सेलिब्रिटी कवी’ होते. त्यांना पक्षाकडून काही मिळाले नाही. मात्र, ओझा सरांनी पहिल्याच फटक्यात विधानसभेचे तिकीट मिळवले. तेही माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा पत्ता कट करून. सिसोदिया यांचा बालेकिल्ला असलेल्या पटडगंज मतदारसंघातून आपने अवधेश ओझा यांना संधी दिली आहे. उत्तर प्रदेश, बिहार व दिल्लीच्या पट्टय़ात या ओझांची क्रेझ आहे. ती क्रेझ त्यांना निवडणूक जिंकून देते का? हे दिसेलच. मात्र, अवधेश यांनी राजकारणात प्रवेश करताच, त्यांनी कुटुंबीय कसे वाऱयावर सोडले, घरच्यांना ते कसे विचारत नाहीत, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मोटिव्हेशनल स्पीकर बनणे सोपे, पण राजकारण तितके सोपे नाही याची यथावकाश जाणीव या सेलिब्रिटी टीचरना झाली असावी. ओझांचे ‘मोटिव्हेशन’ त्यांना निवडणुकीत किती कामाला येते ते दिसेलच!