थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटवून झोपले, कार्बनडायऑक्साईडमुळे तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू

देशात सध्या थंडीचा कडाका सुरू आहे. बर्फाळ प्रदेश असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये तापमानाने निचांकी गाठल्याने थंडीने कहर केला आहे. यामुळेच थंडीपासून बचाव करण्यासाठी तेथील लोकं घरामध्ये रात्रभर शेकोटी पेटवून ठेवतात. मात्र हीच शेकोटी तीन कामगारांच्या जीवावर बेतली आहे. शेकोटीतून निघणाऱ्या कार्बनडाय ऑक्साईडमुळे तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे.

अरबाज, सुरेश आणि सूरज अशी मयत कामगारांची नावे आहेत. तिघेही मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी असून हिमाचल प्रदेशात कार पेंटिंगचे काम करत होते. तिघे दगशाईमधील रेहुन गावात भाड्याच्या घरात राहत होते.

मयतांपैकी एका कामगाराच्या भावाने त्याला फोन केला. मात्र तो फोन उचलत नव्हता. अखेर भावाने कामगारांच्या रुमचा दरवाजा खोलून पाहिले असता तिघे कामगार बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना रुग्णालयात नेले डॉक्टरांनी मृत घोषित केले.

बंद खोलीत पेटवलेल्या शेकोटीतून निघणाऱ्या कार्बनडाय ऑक्साईडमुळे ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली. यामुळे तिघांची प्रकृती बिघडली आणि गॅसमुळे गुदमरून तिघांचा मृत्यू झाला.