50 हजाराचे इनाम असलेला वाँटेड तस्कर अखेर अटकेत; दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

फरार वाँटेड ड्रग्ज तस्कराला अखेर दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद अन्वर खान असे अटक आरोपीचे नाव असून तो 1600 किलो गांजाच्या तस्करी प्रकरणी मुख्य आरोपी होता. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने ओडिशातील कोरापूट जिल्ह्यातून खानला अटक केली. सरकारने खानवर 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

पोलीस आयुक्त संजय कुमार सैनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद अन्वर खानला 2019 मध्ये नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (NDPS) कायद्यांतर्गत नोंदवलेल्या दोन मोठ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. या कारवाईमध्ये एकूण 1,600 किलो गांजा जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी दोन वेगवेगळ्या शहरात चार जणांना अटक करण्यात आली आहे.

मोहम्मद अन्वर खान ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यात लपल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. खान हा बराच काळ फरार होता. पकडले जाऊ नये म्हणून तो वारंवार आपले ठिकाण बदलत होता. सध्या दिल्ली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.