महायुती सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. महाविकास आघाडीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या नागपूरमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत याबाबतची माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, विधानसपरिषेदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हे सरकार आल्यानंतर आतापर्यंत सुमारे 7 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. राज्यातील उद्योगधंदे गुजरातमध्ये जात आहे. राज्याची आर्थिक स्थिती ढासळली आहे. सरकार स्थापन झाल्यानंतरही अद्यापही राज्याला मंत्री देण्यात आलेले नाही. त्यामुळे या सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या समस्यांबाबत आगामी अधिकवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचेही अंबादास दानवे यांनी सांगितले.
नागपूरमध्ये अल्पकाळासाठी हे अधिवेशन होत आहे. नवे सरकार आल्यानंतर आणि विदर्भाचा मुख्यमंत्री असल्याने किमान तीन आठवड्यांचे अधिवशेन होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अप्लकाळसाठी अधिवेशन घेत सरकारने विदर्भाची निराशा केली आहे. राज्याची स्थिती सर्वत्र ढासळत आहे. शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य जनता संकटात असताना सरकारकडून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात येत आहे. त्यामुळे सरकारच्या चहापानाला जाण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तसेच या अधिवेशनाचा कालवधी वाढवण्यात यावा, अशी मागणीही आम्ही केल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
परभणीत हिंसाचारानंतर पोलिसांच्या मारहाणीमुळे एका तरुणाचा कोठडीतच मृत्यू झाला आहे. तो एका विचाराची लढाई लढत होता. ही गंभीर घटना आहे. आम्ही विरोधी पक्ष या घटना शांतपणे बघत बसणार नाही. याबाबत आम्ही लवकर निर्णय घेणार आहोत. बीडमध्ये संतोष देशमुख या सरपंचाची निर्घुण हत्या करण्यात आली. अशी निर्घुण राजकीय हत्या राज्यात याआधी कधीही झाली नाही. यातील आरोपी तेथील पालकमंत्र्यांच्या जवळचे आहेत, असे त्यांचा अतिहास सांगतो. त्यातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी बीडमधील प्रत्येकाला माहिती आहे. गेल्या दोन वर्षात बीडमध्ये 32 खून झाले आहेत. त्याची दखलही घेतली गेली नाही. मंत्रिमंडळाच्या स्थापने आधी अशा घटना घडणे हे गंभीर आहे. हे राज्याच्या अधोगतीचे लक्षण आहे. पाशवी बहुमताच्या आधारावर काहीही करू, असे या सरकारला वाटत असेल तर तो या सरकारचा भ्रम आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
मारकडवाडीतून ईव्हीएमविरोधात सुरू झालेले आंदोलन देशभर पसरेल, असेही आव्हाड म्हणाले. येत्या आठ दिवसात विरोधी पक्ष सक्षमतेने जनतेसाठी अधिवेशनात लढणार आहोत. जनतेलाही लोकशाही वाचवायची आहे, जनतेसाठी आम्ही एकत्रितपणे लढणार आहोत, असेही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडी म्हणून राज्यातील या घटनांचा विरोध करण्यासाठी आम्ही चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.
सरकार आणि अधिवेशनाचे कामकाज परंपरेप्रमाणे चालते. त्यामुळे त्यांनी विरोधीपक्षनेतेपद देणे गरजेचे आहे. त्यासाठी अर्ज द्यावे, असे त्यांचे मत असेल तर त्यांनी याआधीची तसा अर्ज दाखवावा, त्याप्रमाणे आम्ही अर्ज करून असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. महाविकास आघाडी एकत्र आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे त्यांनी स्पष्ट
केले.
विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षांना बोलावत विरोधीपक्षांकडून नेत्याची नावे मागवली जातात आणि विरोधीपक्षनेता ठरवला जातो, त्यामुळे अर्ज वैगेरे काही देण्याची पद्धत नाही. विधानसभा अध्यक्षांनी विरोधकांना बोलावत याबाबतचा निर्णय घ्यायचा असतो, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. आता लाडकी बहीण योजनेत ते काही अटीशर्तीच्या पूर्ततेचे निकष लावत आहे. मात्र, सरसकट सर्व लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची मदत देण्यात यावी, तसेच सरकारने निवडणुकीआधी दिलेल्या वचनांची पूर्तता करावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली.