परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबनेच्या घटनेनंतर संतप्त जनतेने या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंददरम्यान हिंसाचार उफाळला होता. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरूण कार्यकर्त्याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. ही बातमी शहरात पसरताच शहरात तणावाचे वातावण आहे.
परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची मंगळवारी (10 डिसेंबर) रोजी काही समाजकंटकांनी तोडफोड करून विटंबना केली होती. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी संतप्त जनतेने परभणी बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. या हिंसाचारानंतर परभणी पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन राबवत आंबेडकरी कार्यकर्त्यांची धरपकड केली होती. या हिंसाचार प्रकरणी 27 जणांना अटक करून त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परभणी शहरातील एकूण 500 हून अधिक जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या 27 जणांमध्ये सोमनाथ व्यकंट सूर्यवंशी या 35 वर्षांच्या तरूणाचाही समावेश होता. सोमनाथ सूर्यवंशीची शनिवारी सायंकाळी न्यायालयीन कोठडीत असताना प्रकृती बिघडली. त्याला रविवारी शासकीय रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. सोमनाथ सूर्यवंशी हा परभणी शहरातील शंकरनगर भागात भाड्याची खोली घेऊन रहात होता. तो कायद्याचे शिक्षण घेत असल्याची माहितीही समोर येत आहे. सोमनाथ सूर्यवंशी हा कट्टर आंबेडकरी कार्यकर्ता होता. त्याच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. तसेच शहरात तणावाचे वातावरण आहे.
सोमनाथचा मृत्यू नेमका कशामुळे हे सध्या तरी स्पष्ट झालेले नाही. सोमनाथच्या मृतदेहाचे न्यायाधीशांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात येणार आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच सोमनाथच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.