गेल्या वर्षभरापासून मणिपूरमध्ये हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाहीय. शनिवारी पुन्हा एकदा मणिपुरमध्ये हिंसाचाराची घटना समोर आली आहे. शनिवारी दोन मजुरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हे दोन्ही मजूर बिहारचे होते. मणिपूरमधील मैतेई आणि कूकी समुदायांमध्ये सुरु असलेली जातीय संघर्षातून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
ककचिंग जिल्ह्यात शनिवारी दोन कामगारांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सुनेलाल कुमार (18) आणि दशरथ कुमार (17) अशी मृतांची नावे असून ते बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्यातील राजवाही गावचे रहिवासी आहेत. हे दोन्ही तरुण ककचिंग येथील मेईती बहुल भागात राहत होते.. काकचिंग-वाबगाई रोडवरील पंचायत कार्यालयाजवळून कामावरुन सायंकाळी परतत असताना 5.20च्या सुमारास अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. त्यांच्यावर हा हल्ला का केला याचे अद्याप कारण समजू शकले नाही. मात्र मणिपूरमधील मैतेई आणि कूकी समुदायांमध्ये सुरु असलेली जातीय संघर्षातून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.