मिंधे-भाजप सरकारच्या आशीर्वादाने महापालिकेच्या रस्ते कामात घोटाळा, आदित्य ठाकरे यांनी उघड केला होता भ्रष्टाचार

राज्यात मिंधे-भाजप सरकारच्या आशीर्वादाने गेल्या अडीच वर्षांत झालेल्या रस्तेकामांमध्ये घोटाळा झाल्याचे शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी उघड केल्यानंतर आता खुद्द भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी रस्ते कामात घोटाळा झाल्याचा आरोप करीत आयुक्तांकडे चौकशीची मागणी पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे. कुलाब्यातील रस्ते कामाविरोधात त्यांनी आंदोलने केली. यामुळे मिंधे-भाजप सरकारच्या काळात रस्ते कामात घोटाळा झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

सप्टेंबरमध्ये कामाच्या अंदाजापेक्षा 4 टक्के अधिक दराने कंत्राट देऊनही सिमेंट काँक्रीट (सीसी) रस्त्याचे काम कुलाबा तसेच दक्षिण मुंबईत सुरू झाले नसल्याने नार्वेकर यांनी स्पष्ट केले. याबाबत अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर आणि रस्ते विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात चौकशीची मागणी केली आहे.

तीन वर्षांत एकही नवीन रस्ता नाही

पालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही या मुद्द्यावर कोणतीही प्रगती झाली नसल्याचेही नार्वेकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद केले. जानेवारी 2023 मध्ये मुंबईतील सीसी रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन होऊन जवळपास दोन वर्षे उलटून गेली आहेत, दक्षिण मुंबईत गेल्या तीन वर्षांत एकही नवीन सीसी रस्ता पूर्ण झालेला नाही. उर्वरित भागात एकूण कामाच्या केवळ 15 टक्केच काम पूर्ण झाले आहे, असे नार्वेकर म्हणाले.