>> संजय मोने
नाट्यक्षेत्रातील अनेक अवलियांपैकी एक ‘विक्या पाडकर’. खरंतर तो विकास आडकर, परंतु एकांकिका पाडायची की उचलून धरायची यावरून तो ‘विक्या पाडकर’ झाला तो कायमचा.
या लेखाच्या नायकाचं नाव विकास आडकर, पण त्याचा विक्या पाडकर कसा झाला ते आपण पाहू या.
साधारण 1975 च्या नंतरच्या काळात खूप एकांकिका स्पर्धा व्हायच्या. आंतर महाविद्यालयीन स्पर्धा या साधारणपणे तीन-चार असत. त्यात आय.एन.टी, उन्मेष या महत्त्वाच्या. शिवाय दूरदर्शन स्पर्धा दोन-तीन वर्षं झाल्या. त्या अतिशय चांगल्या दर्जाच्या झाल्या आणि आपल्यावर काहीतरी दर्जेदार सादरीकरण केल्याचा नाहक आळ येईल त्यामुळेच की काय देव जाणे त्या अचानक बंद झाल्या. आंतर बँक, आंतर विमा स्पर्धा इत्यादी म्हणजे एकंदरीत सात-आठ दहा स्पर्धा वर्षभर चालायच्या. बहुतेक करून त्या एकांकिकाचे लेखक, दिग्दर्शक हे विद्यार्थी असायचे. काही वेळा मात्र मतदारसंघ स्त्रियांसाठी राखीव झाला की, आदल्या वेळी निवडून आलेले आमदार आपल्या पत्नीला उभे करून जी बिचारी कालपर्यंत दिवसभर स्वयंपाक काय करायचा याच्या भ्रांतेत असायची आणि निवडून आल्यावरही भ्रांत कायम राहायची. असो.विषयांतर फार झालं. तर काही वेळेला तत्कालीन मातब्बर दिग्दर्शक भाडोत्री आणून एकांकिका सादर करायचे आणि
कॉलेजच्या नावावर पारितोषिक प्राप्त करायचे.
या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आता आपण या सगळय़ा एकांकिका पाहणाऱया प्रेक्षकांकडे वळू या. मुख्यत प्रेक्षकांत सरळ सरळ दोन तट असायचे. एक जे समोर दिसेल ते पाहत बसायचे. दुसरे जे समोर सादर होणारी एकांकिका जरा घसरली की, त्यावर काहीतरी बोलून अथवा कृतीने आपली प्रतिक्रिया देऊन मोकळे व्हायचे. आपला पाडय़ा दुसऱया प्रकारातला प्रेक्षक होता. बहुतेक सगळ्या स्पर्धांना तो हजर असायचा. स्पर्धा शक्यतो दिवसभर असायच्या. हा वेळ कसा काढायचा? शिक्षण त्याने त्याच्या दृष्टीने पूर्ण केलं होतं.
“साला, पदवीचा कागद भिंतीवर टांगलेला असेल तरच आपल्याला अक्कल किंवा बुद्धी आहे हे कशावरून?’’ असं वाक्य तो सगळ्यांच्या तोंडावर फेकायचा. पण त्याचा उदरनिर्वाह उत्तम चालत असणार. कारण मोठं ‘उदर’ तो बाळगून होता. आजही तो काय करतो हे कुणालाच माहीत नाही, पण चालकासकट एक भली मोठी गाडी घेऊन तो हिंडताना अनेकांनी त्याला पाहिलं आहे. अरे देवा, पुन्हा विषयांतर झालं. मूळ विषय म्हणजे तो स्पर्धांमधल्या एकांकिका पाडण्यात प्रसिद्ध होता. बरं तो सूडबुद्धीने हे करायचा का? तर नाही.
“वाईट एकांकिका होत असेल तर उगाच त्यावर पांघरूण घालू नका, करणाऱयांना कळलं पाहिजे ना,’’ आणि त्याचं म्हणणं खरं होतं. एक उत्तम प्रयोग होणारी एकांकिका प्रतिस्पर्धी बोंबाबोंब करून पाडायचा प्रयत्न करायला लागले तेव्हा त्याने कंबरपट्टा काढून एकांकिका थांबवली आणि त्या प्रेक्षकांना बडवून काढलं. पुन्हा विषयांतर. आता त्याने पार पाडून टाकलेल्या एकांकिका आणि त्याने त्या कशा पाडल्या याचे किस्से तुम्ही वाचा.
एका स्पर्धेत एकांकिका ज्याक्षणी सुरू झाली, त्याचक्षणी ती पडली होती. कारण एका पात्राला काहीच आठवत नव्हतं. प्रेक्षक शांत होते. आतून कोणीतरी वाक्य सांगायचा प्रयत्न करत होतं. तो आवाजही लोकांना ऐकू येऊ लागला, पण त्या पात्रावर ढिम्म परिणाम नाही. शेवटी विक्या उठला आणि “ए हीरो, काही आठवतंय का?’’
प्रेक्षक ओरडायला लागले, “तुम्ही गप्प बसा, आम्हाला एकांकिका बघू द्या.’’
“काय बघणार? काहीच होत नाहीये, हा हीरो नुसता उभा आहे. ए चल, टाक पडदा.’’ असं म्हणून विक्या स्टेजवर चढला आणि एकांकिका बंद पाडून मागच्या दरवाज्याने गुल झाला.
दुसऱ्या एका स्पर्धेत एकांकिका सुरू झाली. जोरदार संगीत आळवलं गेलं. नेपथ्यही छान होतं. पहिला प्रवेश झाला टाळ्यांचा कडकडाट झाला. पुढच्या प्रवेशाची सुरुवात झाली. एक पात्र आलं आणि म्हणालं, “वकीलसाहेब कधी येणार?’’
“हे काय आलेच.’’ दुसऱया कलाकाराने प्रत्युत्तर दिले… आणि एक जण प्रवेशला. “हे बघा, आलेच वकीलसाहेब.’’
वकील पुढे काही बोलणार तेवढय़ात प्रेक्षकातून विक्या ओरडला, “अरे, हा वकील नाही तिकीट चेकर दिसतोय.’’
या वाक्यावर लोकांच्या हास्यकल्लोळात एकांकिका वाहून गेली.
प्रसंग तिसरा –
एकांकिका सुरू झाली आणि एक कलाकाराने खिशातून सिगारेट काढली. साहजिकच पुढे काडेपेटी काढून ती पेटवायची आणि आपल्या संवादांना सुरुवात करायची ही त्याची कामगिरी होती. त्याने तालमीत करत होता तसा मोठय़ा विश्वासाने आपल्या विजारीत हात सरकवला. बहुधा काडेपेटी नव्हती. त्याने उरलेसुरले किंवा होते नव्हते ते सगळे खिसे चाचपले. काडेपेटी मिळाली नाही. आता नाही मिळाली तर आपले संवाद सुरू करायचे ना, पण त्याला तालमीत बहुतेक शिकवण्यात आलं होतं, सिगारेट पेटवल्यावरच संवाद म्हणायचे. त्याची चाचपणी संपेना आणि एकांकिका पुढे जाईना. विक्या अचानक बसल्या जागेवरून उठला आणि त्याने आपल्या खिशातून काडेपेटी काढून रंगमंचावर भिरकावली. बस्सं, अचानक प्रेक्षागृहातून चहुबाजूने अगणित काडेपेटय़ा मंचावर भिरकावल्या गेल्या. कलाकार गुडघ्यावर बसून वाक्य विसरून गेला आणि एकांकिका भिरकावली गेली. प्रथेप्रमाणे विक्या कधीच बाहेर निघून गेला होता. कोणी काय केलं ते कोणालाच कळलं नाही.
हा विक्या हे असं का करतो, एकांकिका का पाडतो त्याची गोष्ट सांगतो आणि लेख आवरता घेतो. तो एकदा एका स्पर्धेच्या आधी त्याच्या कॉलेजच्या एकांकिकेत काम करायला गेला होता. संहितेचं वाचन झालं. विक्याने थोडं वाचलं आणि त्याची निवड झाली नाही.
“तुला आयुष्यात अभिनय येणार नाही. निघ इथून.’’ असं दिग्दर्शक म्हणाला.
“ठीक आहे, पण मला प्रयत्न तर करायला द्या.’’ विक्याने विनंती केली.
“तालमीच्या वेळी इतरांना चहा द्यायच्या वेळेला ये, तेच काम जमेल तुला.’’ दिग्दर्शकाने तुकडा मोडला.
“ठीक आहे. मी रोज तालमीच्या वेळी रोज येईन आणि जी काय मदत लागेल ती करीन.’’
दिग्दर्शकालासुद्धा मदतीला कोणीतरी हवाच होता. प्रयोग होईपर्यंत विक्या रोज यायचा. मन लावून तालीम बघायचा. तालमी झाल्या. रंगीत तालमीचा दिवस उजाडला आणि त्या दिवशी विक्या गायब. दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ प्रयोगाला पोहोचले. विक्या गायब. एकांकिका सुरू झाली. पहिल्या कलाकाराचा प्रवेश झाला. तो आत आला आणि प्रेक्षकांतून एक आवाज आला,
“डाव्या बाजूला चपला काढ आणि खांद्यावर असलेली झोळी खुंटीला अडकव.’’ पात्राने तसंच केलं.
“आता आतून एक बाई चहा विचारेल, तिला सांग मधुमेह आहे. साखर नको.’’
दिग्दर्शकाने जसं नाटक बसवलं होतं तसं कलाकार करत होते, बोलत होते आणि फक्त विक्याला ते सगळं माहीत होतं म्हणून तो फक्त प्रेक्षकांना ते सगळं आधीच सांगत होता. त्या प्रयोगाचा बोऱया वाजला आणि विक्याने त्याचा सूड उगवला. तेव्हापासून विक्या एकांकिका पाडायचा किंवा उचलून धरायचा.
आता तो कुठे आहे माहीत नाही. मीही एकांकिका करत नाही. अख्खं नाटक करतो, पण तो कधीही येईल ही भीती कायम आहे. एकच प्रार्थना विक्याला आहे, नाही आवडला प्रयोग तर संपल्यावर येऊन भेट आणि हजामत कर, पण चालू प्रयोगात तोंड उघडू नकोस.