>> अनिल हर्डीकर
प्रथमदर्शनी प्रेम मानणारे काही असतात. चरित्र अभिनेत्री सुलोचना यांची लेक कांचन यांचे डॉ. काशीनाथ घाणेकर यांच्यावर जडलेले प्रेम असेच. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाच्या प्रयोगाला त्यांची घडलेली भेट या नात्याचे बीज रुजवणारी ठरली.
1966 साली दिलीप कुमार यांचा वयाच्या 44 व्या वर्षी सायरा बानो यांच्याशी निकाह (विवाह) झाला. त्यावेळी सायरा बानो अवघ्या 22 वर्षांच्या होत्या.
सायरा बानो यांच्या अभिनेत्री असलेल्या आईकडे युसूफ खान अर्थात दिलीप कुमार यांचे येणे-जाणे होते. तारुण्यात शिरल्या शिरल्या सायरा बानो यांनी मनाने युसूफला मनातून वरले होते. निकाह झाल्यानंतर दोघांनी अखेरपर्यंत सुखी संसार केला. हे आता सांगण्याचं किंवा आठवण्याचे कारण सुलोचना या मराठीतच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतदेखील गाजलेल्या चरित्र अभिनेत्री यांची लेक कांचन यांचे डॉ. काशीनाथ घाणेकर यांच्यावर जडलेले प्रेम.
प्रथमदर्शनी प्रेम मानणारे काही असतात, तर काही प्रेम हे सहवासाने जडत जाते असे मानणारे! वहीदा रेहमान गुरुदत्त यांना पहिल्या भेटीत अत्यंत सामान्य वाटली होती. तिचे पडद्यावरचे नृत्य पाहिल्यावर वहीदाने गुरुदत्त यांना आकर्षित केले होते.
तारुण्यात पदार्पण केल्या केल्या कुणा पुरुषाच्या प्रेमात पडण्याचा, आकर्षित होण्याचा प्रसंग, योग अनेक तरुणींच्या आयुष्यात येत असेलही. पण तो पुरुष त्यांचा आयुष्यभराचा साथीदार होऊ शकतोच असे नाही. पण कांचनच्या बाबतीत तसे झाले नाही. डॉ. काशीनाथ घाणेकर यांच्याशी कांचन यांच्याशी ओळख होण्यापूर्वी ते विवाहित होते. त्यांची पत्नी इरावती व्यवसायाने एक यशस्वी डॉक्टर होती. असो. मला सांगायचे आहे त्या दोघांच्या पहिल्या भेटीबद्दल. ज्या भेटीत कांचनने डॉक्टरांना मनोमनी वरले त्याबद्दल. त्यांनी ‘नाथ हा माझा’ या आत्मकथनपर पुस्तकात ते शब्दबद्ध केले आहे. सुलोचना यांची लेक कांचन एसएससीला होती. शाळेला नाताळची सुट्टी लागलेली होती. आई जिला कांचन आत्ती म्हणत असे ती एक लोकप्रिय आणि आदरणीय व्यक्ती होती. समाजात, चित्रपटसृष्टीत तिचा दबदबा होता. तिच्याबद्दल आदरयुक्त भीती होती. घरी चित्रपटसृष्टीतील लोकांचे येणे-जाणे नित्याचे होते.
पूना गेस्ट हाऊसचे मालक चारुदत्त सरपोतदार सुलोचना यांच्या घरी आले होते. त्यांना सुधा करमरकर यांनी त्यांच्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाच्या सन्मानिका देऊन आमंत्रित केलं होतं. चारुदत्त सरपोतदार आणि सुलोचना यांचे नाते भावा-बहिणीसारखे. त्यांनी कांचनला विचारले, “नाटकाला येणार का?’’ कांचनने त्या नाटकाची जाहिरात दोन महिन्यांपासून पाहिली होती. घरातील मुलं सिनेमाला जात तेव्हा त्यांची आजी नेहमी बरोबर असे. आजीला संगीत नाटकाचं वेड होतं. त्यातून बालगंधर्व तिच्या विशेष आवडीचे. गद्य नाटकं तर तिला आवडत नसत. मात्र कांचनने ‘लग्नाची बेडी’ या नाटकाचे अनेक प्रयोग पाहिले होते. मात्र ‘दुरिताचे तिमिर जावो’ लहान मुलांनी पाहावे असे आदर्श नाटक म्हणून घरातल्या मुलांना दाखवले होते. एसएससीचे वर्ष असल्यामुळे घरात नाटकाचा-सिनेमाचा विषय नव्हता. कांचनचा अभ्यास बऱयापैकी झालेला होता. कांचनदेखील तोच तोच अभ्यास करून कंटाळलेली होती. म्हणून चारूकाकांच्या नाटकाला आत्तीबरोबर कांचनदेखील भारतीय विद्याभवनला निघाली.
भारतीय विद्याभवनमधले ते चार तास अलिबाबाच्या गुहेत शिरल्यासारखे वाटले. नाटक असेही असू शकते याची प्रथमच जाणीव झाली. कांचनचा जन्म कोल्हापूरचा. त्यातून तिथल्या सरंजामशाहीच्या अवशेषामध्ये सुरुवातीची दहा वर्षे गेल्याने ऐतिहासिक वातावरणाची आवड कांचनला होती. नाटकात लेखन, अभिनय, नेपथ्य, पार्श्वगीत, प्रकाशयोजना आणि दिग्दर्शन या सर्वच बाजूंनी श्रीमंती जाणवत होती. तिन्ही अंकांनी प्रेक्षकांना बांधून ठेवले होते. मध्यंतरातही नाटकाचा कैफ उतरत नव्हता. मात्र कांचनला सगळ्यात आकर्षित करणारी जर कोणती गोष्ट असेल तर संभाजीची भूमिका करणारा अभिनेता.
त्या अभिनेत्याचे नावदेखील तिला माहीत नव्हते. पण त्या अभिनेत्याला भेटण्याची तिची इच्छा तीव्र होती. नाटक संपल्यावर सुधाताईंना भेटण्यासाठी सगळे रंगपटात गेले. सुलोचना आणि सुधाताई करमरकर यांचा थोडा पूर्वपरिचय होता. सुधाताई कांचनच्या आत्तीशी (सुलोचना) नाटकातील एकेका कलाकाराचा परिचय करून देत होत्या. अर्थात त्यात पहिली व्यक्ती होती मास्टर दत्ताराम. सुलोचनाताई त्यांच्यासमोर आदराने झुकल्या. कांचनची नजर मात्र शोधत होती संभाजीला. उंचापुरा, भेदक डोळ्यांचा, देखणा, भरदार संभाजी तिला कुठे दिसेना आणि एवढय़ात सुधाताईंचा आवाज, शब्द कानावर पडले, “हे संभाजीचं काम केलेले डॉ. काशीनाथ घाणेकर!’’ कांचन दचकलीच. “हे?’’ तंग सुरवार, त्याच्यावर बाह्या असलेला गंजीफ्राक घातलेला, प्रकृतीने किरकोळ वाटणारा एक तरुण जिरेटोप छातीशी कवटाळून कांचनच्या समोर उभा होता. सुलोचना यांच्याशी कधी ओळख करून दिली जातेय याची अधीरपणे वाट पाहात होता. रंगपटातील त्या संभाजीला पाहून कांचनची निराशा झाली. मेकअप पॅडिंगच्या सहाय्याने किरकोळ वाटणाऱया घाणेकरांना नखशिखांत बदलून टाकले होते. पण त्यांचा अस्सल अभिनय, गाभाऱयात घुमावा तसा घुमारदार आवाज आणि भेदक पाणीदार डोळे इतर उणिवांवर मात करत होते.
कांचन घरी आली खरी, पण डॉ. काशीनाथ घाणेकर या नऊ मंत्राक्षरांनी ती मंतरली गेली ती कायमची. त्या आकर्षणाचे स्वरूप सापडत नव्हते. भाऊ, काका, मामा या नात्याचे लेबल मात्र त्याला नक्कीच नव्हते. मात्र बीज कुठेतरी रुजले होते. कांचनच्या नकळत ते वाढत होते… कांचन यथावकाश सौ. कांचन काशीनाथ घाणेकर झाली.