लोकसभेत संविधानवरील चर्चेत विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवत मोदी सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी द्रोणाचार्य आणि एकलव्यची कथा सांगितली. ज्या प्रकारे एकलव्यचा अंगठा कापून घेतला होता तशाच प्रकारे मोदी सरकार दलित, मागास आणि तरुणांचे अंगठे कापत आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. यावेळी राहुल गांधी यांनी उद्योजक गौतम अदानी, पेपर लीक आणि संविधानचा मुद्द्यावरूनही आवाज उठवला.
दिल्लीत अनेक वर्षांपूर्वी एका तरुणाने तपस्या केली होती. त्या तरुणाचं नाव होतं एकलव्य. एकलव्य धनुर्विद्येचं प्रशिक्षण घेण्यासाठी ब्राह्मण द्रोणाचार्यांकडे गेला. पण त्यांनी धनुर्विद्येचं प्रशिक्षण देण्यास नकार दिला. कारण एकलव्य दलित होता. पुढील कथा आपण सर्वांनी ऐकलेली आहे. एकलव्यची गुरुभक्ती पाहून एक दिवस द्रोणाचार्य यांनी त्याचा अंगठाच मागितला. हा अंगठा त्याचं भवितव्य होतं, असे राहुल गांधी म्हणाले.
उद्योजक गौतम अदानीला पोर्टपासून एअरपोर्ट दिले जात आहे. मोनोपॉली व्यवस्था उभी केली जात आहे, जी संविधानात लिहिलेली नाही. याद्वारे सरकार तरुणांचे अंगठे कापत नाहीये का? अग्निवीर योजना लागू केली. लष्करात भरती होण्याची अपेक्षा असणाऱ्या तरुणांचे या योजनेच्या माध्यमातून सरकार अंगठे कापत आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये लॅटरल एन्ट्रीचा वापर होतोय. लॅटरल एन्ट्रीने सरकार थेट नवीन भरती करत आहे. यामुळे थेट ओबीसी तरुणांचे अंगठे कापले जात आहेत. मुंबईतील धारावीची जमीन उद्योगपतीला दिली जात आहे. सरकारचा हा निर्णय धारावीवासियांचे अंगठे कापणारा आहे. या सरकारच्या काळात 70 पेपर लीक झाले. यामुळे विद्यार्थ्यांचे अंगठे कापले गेले, असे हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.
अरक्षणाची मर्यादा हटवणार
जिथे-जिथे तुम्ही जाता धर्मा-धर्मांत भांडणं लावता. द्वेष पसरवता. दलित परिवाराला घरात बंद करून गुन्हेगारांना मोकाट सोडलं जातंय, हे कुठल्या संविधानात लिहिलं आहे? आम्ही इंडिया आघाडी मिळून संविधानाचे रक्षण करत आहे. राजकीय समानता संपली आहे. हिंदुस्थानच्या सर्व संस्थांवर कब्जा करण्यात आला आहे. सामाजिक आणि विषमता निर्माण झाली आहे. आणि यामुळेच जातनिहाय जनगणना गरजेची आहे. त्यामुळेच आम्ही जातनिहाय जनगणनेची मागणी करतोय. आमचे सरकार आल्यावर आम्ही जातनिहाय जनगणना करू. जातनिहाय जनगणना केल्यावर आम्ही आरक्षणावरील 50 टक्क्यांची मर्यादा हटवू. याच सभागृहात ही मर्यादा तोडू, असे राहुल गांधी म्हणाले.