परीक्षण – निर्विष विरह कविता

>> किरण येले

बीर म्हणतो, ‘पढी पढी जग मुवा पंडित भया न कोय, ढाई अक्षर प्रेम के, पढे सो पंडित होय.’ ज्याने प्रेमाची अडीच अक्षरे वाचली त्याला जग समजलं असं कबीर म्हणतो. पण प्रेम हे वाटते तितकी सहज, सोपी गोष्ट नाही आणि कबीराला अपेक्षित असलेलं फक्त अडीच अक्षरांतलं प्रेम तर सामान्य नाहीच.

प्रेम मुक्या प्राण्यावरचं, प्रेम निसर्गावरचं, प्रेम माणसावरचं, प्रेम कलेवरचं आणि प्रेम प्रियकर-प्रेयसीचं. प्रेम सगळे करतात, जसं प्राणवायू सहज घेतात आणि सोडतात. श्वास घेताना आपल्याला जाणीव नसते की न दिसणारा जो प्राणवायू आहे तो आपला हा जीव जगवतो आहे. आपल्या रंध्रारध्रात जीव फुंकत आहे तो, तो आहे. आपण त्याचे आभारी नसतोच कधी. प्रेमातही आपण तसेच असतो. आपल्याला फक्त आपण दिसत असतो. वारंवार आरशात आपण स्वतला पाहात असतो.
पण प्रेम म्हणजे ‘स्व’चा लोप. तो ‘स्व’ लोप पावला की दिसू लागतो शीतल चांद्रप्रदेश. प्रेम या अडीच अक्षराचं अलौकिकपण आपल्याला समजलेलं नसतं, हे आजही आसपासच्या अनेक उदाहरणांवरून दिसून येतं. प्रेम म्हणजे शरीरापासून आत्म्यापर्यंत जाण्याचा प्रवास. पण अनेक जण बाह्यप्रेम करत राहतात. शरीराच्या माध्यमातून फक्त शरीरातच घुटमळत राहतात आणि मग आत्म्यापर्यंतच्या प्रवासात लागणारा सुंदर प्रदेश त्यांना दिसत नाही. पुढे मग त्याच त्याच शरीराचा त्यांना कंटाळा येऊ लागतो. त्याच त्याच गप्पांचा कंटाळा येऊ लागतो आणि मग प्रेम संपतं. पण खरं तर अशा संपलेल्या वा भंग झालेल्या प्रेमात, प्रेम कधी सुरूच झालेलं नसतं. सुरू असतं तो फक्त स्वतःच्या अहमची आणि शरीराची तृप्ती. प्रियकर असो, प्रेयसी असो, निसर्ग असो की देव वा देश. त्यावर प्रेम करणं सोपं नाही. कारण प्रेम म्हणजे अद्वैत, प्रेम म्हणजे पूजा, प्रेम म्हणजे समर्पण आणि ‘स्व’चा लोप. प्रेमात काही कारणाने जेव्हा दूर राहावं वा व्हावं लागतं तेव्हा जे उजळून निघतं ते प्रेम. जे एकमेकांना जाळत नाही, जळण्यापासून वाचवतं ते प्रेम मीरेचं, राधेचं आणि अनयचंही.

जे प्रेमाबद्दल तेच प्रेमकवितांबाबतही म्हणता येईल. प्रेम न समजल्याने शरीरी भाषा न बोलता अंतरात्म्याचे रव सांगणाऱया अस्सल प्रेमकविता कोणत्याही भाषेत अभावाने सापडतात. अशा काळात नुकताच प्रकाशित झालेला, हस्ताक्षर प्रकाशन गृहचा ‘तुझं शहर हजारो मैलांवर’ हा कवयित्री सुनीता डागा लिखित कवितासंग्रह निखळ प्रेमकविता वाचनाचा आनंद देतो.
या कवितासंग्रहात 60 कवितांतून प्रेमातील निर्विषता, समर्पण, सामंजस्य, समजून घेणं, समजावून सांगणं, धीर देणं आणि धीराने घेणं कसं असतं हे जाणवत राहतं. संग्रहात शेवटच्या ‘काळाच्या बाहेर’ या कवितेत कवयित्री लिहिते,
मला भीती वाटते की,
तुला गुन्हेगारांच्या पंक्तीत नेऊन बसवेन मी
माझ्या साहण्याचे डाग तुझ्या उजेडाला लागू नयेत… झाकून जाऊ नये वैराग्य…
एक क्षमाभाव पेरावा माझ्या आत त्या क्षमाभावानं
असंख्य दीप जळावेत, तुझ्या माझ्या वाटेवर
भोगलेल्या प्रत्येक क्षणांना वेढलेला मिट्ट काळोख मिटवत… तुला माझ्यापासून मुक्त करत
कवितागत नायिकेला भीती आहे की तिच्याही नकळत तिच्याकडून कटु घडेल. म्हणून ती प्रार्थना करते की, एक क्षमाभाव पेरावा माझ्या आत आणि असंख्य दिवे उजळावेत.

संपूर्ण कवितासंग्रह अशा शांत आणि तरल समजूतदार शब्दांनी वाचकाला मोहवत, प्रेमजाणिवांचे निखळ रूप समोर मांडत राहतो. प्रेम असफल झाल्यावर आलेल्या नैराश्यातून अनेक वेळा एकमेकांना जिव्हार चटके दिले जातात. विरह कवितेमध्येही ही बाब दिसते. पण या कवितेत ते नाही. हतबलता आहे, पण चिडचिड नाही. जे झालं ते समजून घेण्याचा प्रयत्न आहे. हे समजून घेणं ज्या अलवारपणे कवयित्री सुनीता डागा यांनी लिहिलं आहे त्याला दाद द्यावी लागेल.
वाटत राहील मला की
तू थांबायला हवं होतंस काही काळ
विसावला असतास थोडा वेळ तर
एक सावली नेता आली असती तुला सोबत
मात्र रखरखत्या उन्हातच होती तुझी लढाई
स्वतशीच…
प्रेम म्हणजे मिळवणं नाही तर दुसऱयाला मिळवून देणं आहे, हे समजल्यावर अशा कविता येतात. निर्भेळ प्रेम मिळणं आणि ते निसटून जाणं, यामागे नियती असते. कोणतीही स्थिती कायम राहात नाही. बदल होणं तर सृष्टीचा नियम. त्यामुळे अनाकार आणि अरुप प्रेमात संभ्रम निर्माण करणाऱया परिस्थितीत मन अस्थिर असेल तर दुरावा निर्माण होतो. तो दुरावा प्रगल्भपणे स्वीकारणं हेही प्रेमच असतं.
नियती वा प्राक्तनाचा हा विरोधात गेलेला निर्णय समजून घेण्याचा हा सूर सर्व कवितांतून वाहताना एखाद् दुसऱया कवितेत तक्रारींकडे झुकतोही. उदाहरणार्थ ‘अवचित निघून गेल्यावर’ कवितेत ती म्हणते,
न सांगता अवचित आपल्या जगात
निघून जाण्याच्या तुझ्या सवयीनं अस्ताव्यस्त होत राहिलं जगणं
तुझ्या जगाचा विचार करत
हरवत गेलं जगण्याचं प्रयोजन
परंतु सुनीता डागा यांची कविता आक्रस्ताळी होत नाही. ती दोषारोपण करत नाही.
या सर्व कविता संवादी आहेत. काही कविता, तिने त्याला उद्देशून केलेले भाष्य आहे तर काही कविता त्याने तिला उद्देsशून तिच्या आठवणीत केलेलं भाष्य आहे. या सर्व कविता म्हणजे अंतर्बाह्य घुसळण असल्याचं लक्षात येतं. प्रेम म्हणजे नेमकं काय? प्रेम कसं असतं? त्याची परिभाषा काय असते? विरह म्हणजे नेमकं काय? एकमेकांना जीव लावणारे आणि श्वास झालेले दोन जीव वेगळे होतात म्हणजे नेमकं काय होतं? आणि वेगळं झाल्यावर त्यांची काय अवस्था होते यावर निष्पक्षपणे केलेलं चिंतन वा शोध म्हणजे या कविता आहेत.
दुःखाचा एक वास पसरलाय का
ज्याची चव कायम रेंगाळत असते
माझ्या जिभेवर? किंवा
तू कोणतंही पुस्तक, वाचत नाहीस पूर्ण
तुझ्या अनेकानेक अर्धवट
पुस्तकामध्ये अशीच मिटून गेले मी…
सुनीता डागा यांची कविता तरल होत असतानाच दुःखाचा वास, पुस्तकात मिटून गेलेली ती, मोहाच्या जागा दाहक, तुझा अभिजात उपरोध, अभोगी इच्छा, तृष्णेला शाप अतृप्तीचा अशी अनवट आणि वेगळी शब्दयोजनेमुळे पेरत राहते. या कवितेची शैली ओघवती आहे. काही कवितांचा बाज समकालीन हिंदी कवितेसारखा असल्यासारखे जाणवते ही या कवितेची जमेची बाजू म्हणता येईल. तर काही वेळा कविता त्याच आवर्तनात फिरते आहे असं वाटतंही, परंतु निखळ प्रेम, विरहातील जाणीव यांचा सगळ्याच कोनातून सजगतेने विचार करणारी ही कविता आहे. म्हणूनच मराठी वाचक उस्फूर्तपणे या कवितेचे स्वागत करत असल्याचं दिसत आहे.

तुझं शहर हजारो मैलांवर
लेखिका – सुनीता डागा
किंमत – 299
पृष्ठे – 131