>> प्रेमसागर मेस्त्री
आंतर-सरकारी पॅनेल ऑन क्लायमेट चेंजनुसार, अनेक देशांमध्ये स्थानिक पर्वत नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याची जाण ओळख आपल्याला व्हावी आणि आपण पर्वत डोंगररांगा यांकडे डोळसपणे बघावे आणि संवर्धनासाठी त्या परिस्थितीत प्रयत्न करावे ही काळाची गरज नवीन पिढीला जाणून देणे महत्त्वाचे आहे.
जैविक विविधता संवर्धन आणि संरक्षण करण्याचे काम त्या-त्या देशातील पर्वतांवर अवलंबून आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती, प्राणी, पक्षी, त्याचबरोबर येणारी प्रादेशिक संस्कृती हेदेखील पर्वतांच्या संरचनेचा एक भाग असतेच, पण त्या पर्वतीय नैसर्गिक ध्वनी प्रति ध्वनी यांचे प्रतीक म्हणून नेहमीच आपण पर्वताची पूजा अख्ख्या जगभरात करत आलो आहोत. अगदी अमेरिकेपासून पूर्व आशियाई देशांमध्ये पर्वतीय प्रदेश नेहमीच देवदेवतांचे रूप मानले गेले आहेत. अनेक पर्वतीय प्रदेशांमुळे तिथल्या देशांचे नैसर्गिक संरक्षणदेखील झाले आहे. आपल्याकडे भारतामध्ये उंच हिमाचल पर्वतरांगेमुळे आपल्याला नैसर्गिक संरक्षण भिंत लाभली आहे.
इतिहासकालीन अनेक आक्रमणांचा लेखाजोखा बघितला तर ही सर्व आक्रमणे पाकिस्तान, गुजरात, राजस्थान आधी भागांतून भारतात झालेली आढळतात. कारण पर्वतीय प्रदेशांचा अनुभव जगातील अनेक देशांना नव्हताच. त्यामुळे थेट पर्वतावरून चढून आक्रमण करणे त्यांना कधी जमलेच नाही. पर्वतांतून उगम पावणाऱया नद्या आणि या नद्यांमुळे निर्माण होणारा सुजलाम सुफलाम देश हा सातत्याने तेथील स्थानिक लोकांमध्ये नवकल्पना, कला, नृत्य, खाद्यसंस्कृती, वाद्य यांना अनुकूल साहित्य तयार करण्यास मानवाला भाग पाडतो.
पर्वत नैसर्गिक साधनसंपत्ती या दृष्टिकोनातून आपल्या लोकांच्या क्षमता आणि गरजा नियंत्रित करतो. शाश्वत भविष्यासाठी पर्वत हा अतिशय निसर्गसंपन्न उपाय आपल्यासमोर स्पष्ट दिसतो. 1992 ते 2009 पर्यंत मनालीकडे जाण्याचा रस्ता किंवा शिमला डलहौसी आदी हिल स्टेशनकडे जाण्याचे रस्ते हे मोकळे सुनसान असायचे. पर्वतांमध्ये गर्द काळोख पसरलेला दिसायचा, पण आता बघितले तर हरयाणापासून रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला अनेक वस्त्या, हॉटेल्स, अनेक गावे टेकडीवर वसलेली दिसतात. या सर्व पर्वतीय प्रदेशात इतकी वस्ती झाली आहे की, स्थानिक कोण आणि परदेशी कोण? असा प्रश्न आपल्याला पडतो. डोंगर पर्वतांबरोबर त्यासंबंधित गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी आज अनेक नवीन तांत्रिक प्रगती पाहावयास मिळते. तसेच स्मार्ट शेतीसारखे शेतीतील सर्जनशील प्रयोग यशस्वी होताना दिसतात.
त्याचबरोबर पर्वतांवरील हवामान बदलाच्या तेथील नवनवीन विकास प्रकल्पांमुळे अनेक समस्या आज निर्माण झाल्या आहेत. मग त्यात लँड्स्लाइड्स, महापूर, ढगफुटी, तापमान वाढ, मोनोटोनस आग्रीकल्चर डेव्हलपमेंट या सर्व समस्यांना सामोरे जात असताना संशोधनातील लवचिकता, नवीन तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी आणि असुरक्षा कमी करण्यासाठी अनावश्यक विकासावर नियंत्रण करणे काळाची गरज निर्माण झाली आहे. अनुकूलन धोरणांमध्ये नैसर्गिक आपत्ती, हवामान बदल आधी जोखीम कमी करण्यासाठी इकोसिस्टम-आधारित दृष्टिकोन आणि स्वदेशी ज्ञान प्रणालींचे एकत्रीकरण यांसारख्या उपायांचा अभ्यास व उपाययोजना त्वरित करणे आवश्यक आहे.
यामध्ये स्थानिक तरुणांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. आजकाल गावातले, पहाडात राहणारा तरुण व्यवसायासाठी, दर्जेदार रोजगार, सुलभ प्रशिक्षण व आधुनिक शिक्षणासाठी शहराकडे जाताना दिसतो. गावे एकाकी होताना दिसत आहेत. स्थानिक संसाधनांच्या शाश्वत वापरासाठी प्रात्यक्षिक आणि शिक्षण देणे तसेच तेथे निर्माण होणाऱया संधींना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, तरच तरूणाई गावाकडे वळेल.
आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस का हवा?
नैसर्गिक खजिना म्हणजेच आपल्या इथली पर्वते आहेत. त्यातून लोखंड, अनेक धातू, हिरे, सोने, माणिक इत्यादी गोष्टींचे उत्खनन होत आहे. भारतात एकूण 18 टक्के लोक पर्वतीय प्रदेशात राहतात, तर जैवविविधता आणि पर्यावरण याचे देशातील सर्वात जास्त बायोडायव्हर्सिटी हॉट स्पॉट्स हे पर्वत डोंगराळ भाग यांना लागून आहेत. दैनंदिन जीवनात लागणारे गोडे पाणी पर्वतांतून येते. शेती, पिण्यासाठी पाणी, स्वच्छ ऊर्जा, औषधांचा पुरवठा या सगळ्यांसाठी तसेच महत्त्वाचे म्हणजे पाणी हे सर्वोत्तम औषध असल्याचे आपण मानतो. परंतु मानवी हव्यासापोटी दुर्दैवाने जंगलतोड, अनियमित उत्खनन, कोणतेही निर्बंध न पाळता केलेला रस्त्याचा वारेमाप विकास हा आज हवामान बदल, अनिश्चित पाऊस, भयानक वादळे आदी अनेक घातक परिणाम निर्माण करीत आहे. अतिशोषण आणि दूषिततेमुळे संपूर्ण पर्वतीय परिस्थिती धोक्यात आली आहे. जागतिक तापमान वाढ, प्रदूषित हवामान अति उष्ण उबदार होत आहे. पर्वतीय हिमनद्या वितळण्याचे प्रमाण गेल्या दोन दशकांमध्ये प्रचंड वाढले आहे. ज्यामुळे गोडय़ा पाण्याच्या पुरवठय़ावर वादळी पावसामुळे पर्वतीय लोकांना भयानक संघर्षांना सामोरे जावे लागत आहे. खोलगट डोंगराळ भागातील उतारावरची सुपीक शेती आता लँडस्लाइडमुळे, वाहून आलेल्या रेताड वाळू पसाऱयात निकामी होत आहे. वसाहती किंवा मोठमोठाले फार्म हाऊस सुविधांसाठी जंगल साफ करतात. मातीची प्रमाणाबाहेर धूप होते. धूप आणि प्रदूषण हे खालच्या प्रवाहात वाहणाऱया पाण्याच्या गुणवत्तेला आणि मातीच्या उत्पादकतेला धोका पोहोचवतात. विकसनशील देशांमधील 311 दशलक्ष ग्रामीण पर्वतीय लोक प्रगतीशील जमिनीच्या ऱहासाच्या संपर्कात असलेल्या भागात राहतात. त्यांच्या शेतीचे 178 दशलक्ष अन्न असुरक्षित मानले जातात.
FAO मार्फत 2003 सालापासून आपण आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा करीत आहोत. या दिनानिमित्त जागरुकता निर्माण करून पर्वतांच्या विकासातील संधी आणि अडथळे आपल्याला अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे. जगाच्या 80 टक्के अन्नाचा पुरवठा करणाऱया 20 वनस्पती प्रजातींपैकी आठ पर्वतांमध्ये उगम पावल्या आहेत. मका, बटाटे, बार्ली, ज्वारी, बाजरी, भात, अनेक फळझाडे, टोमॅटो आणि सफरचंद, अनेक औषधी वनस्पती फक्त डोंगर पर्वतांमुळे आपल्याला उपलब्ध होतात. चला या आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त आपल्या आजूबाजूच्या छोटय़ा डोंगर टेकडय़ा, पर्वते आणि उंचच उंच पर्वत, शिखरे यांची पुन्हा नव्याने सजग ओळख करून घेऊया व संवर्धन करूया. वणवा, जंगलतोड, उत्खनन आदी बाबींना रोखून पर्वतांना वाचवूया.
– [email protected]
(लेखक रायगड जिल्हा, मानद वन्यजीव रक्षक आहेत.)