टॉमी हिलफिगर, पॅलविन क्लेन आणि झारा या नामांकित कंपनीच्या नावाने हलक्या दर्जाचे कपडे विकून ग्राहकांची फसवणूक करणाऱया वांद्रय़ाच्या हिल रोड परिसरातील दोन दुकानांवर आर्थिक गुन्हे नियंत्रण शाखेच्या पथकाने कारवाई केली. त्यांच्याकडून तब्बल 10 लाख 19 हजार किमतीचे हलक्या दर्जाचे कपडे हस्तगत केले.
वांद्रय़ाच्या हिल रोडवर असलेल्या द हॅप आणि पॅन्डी या दोन दुकानांमध्ये नामांकित पंपनीच्या नावाने हलक्या दर्जाच्या कपडय़ांची विक्री केली जात असल्याची तक्रार आर्थिक गुन्हे नियंत्रण शाखेकडे आली होती. त्यानुसार प्रभारी निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार महेश नाईक, चंद्रकांत वलेकर, विशाल यादव व पथकाने गुरुवारी त्या दोन्ही दुकानांवर एकाच वेळी छापा टाकला. नामांकित पंपनीच्या नावाने टी शर्ट, शर्ट आदी हलक्या दर्जाचे कपडे विकत असल्याचे आढळून आले.
काळाबाजार करणारे अक्षय छाब्रिया (35) आणि किशोर मयांक (59) या दोघांविरोधात कॉपीराईट अन्वये गुन्हा दाखल करून त्यांच्या दुकानातील दहा लाख 19 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईसाठी त्यांना वांद्रे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.