चोगले हायस्कूल, माधवराव भागवतला कबड्डीचे विजेतेपद

मुलींमध्ये बोरिवलीच्या एस.एस.पी.चोगले हायस्कूलने, तर मुलांमध्ये श्री माधवराव भागवत संघाने 45 व्या आंतर शालेय प्रबोधन क्रीडा महोत्सवातील कबड्डी स्पर्धेत जेतेपदावर मोहोर उमटवली. मुलींच्या कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत बोरिवलीच्या एस.एस.पी.चोगले हायस्कूलने वांद्रे पूर्व येथील महात्मा गांधी विद्यालयाला 30-26 असे 4 गुणांनी पराभूत करत विजेतेपद उंचावले. एस.एस.पीच्या प्रचीती नाईकवाडेने शानदार खेळ करत आपल्या संघाला जेतेपद पटकावून दिले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रचीतीचीच निवड करण्यात आली. मुलांच्या कबड्डी स्पर्धेत माधवराव भागवत विरुद्ध विद्यानिधी मराठी माध्यम असा अंतिम सामना रंगला. माधवराव भागवत संघाच्या अष्टपैलू कामगिरीसमोर विद्यानिधीचा टिकाव लागला नाही. चढाई आणि पकड अशा दोन्ही आघाडय़ांवर माधवरावने शानदार कामगिरी करत हा सामना 23-4 असा 19 गुणांनी एकतर्फी खिशात घातला. या संघाचा श्लोक गुप्ता हा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी ठरला.