ईडी अधिकारी म्हणाला, भाजपात असता तर केसच झाली नसती! छापेमारीनंतर आठ दिवसांत उद्योजकाची पत्नीसह आत्महत्या

मध्य प्रदेशच्या सिहोरमधील काँग्रेस समर्थक उद्योजक मनोज परमार यांनी शुक्रवारी घरात पत्नीसह गळफास घेऊन आत्महत्या केली. आठ दिवसांपूर्वीच त्यांच्या कार्यालयांवर ईडीने छापेमारी केली होती. या कारवाईच्या दबावातून परमार दाम्पत्याने जीवन संपवले. परमार यांची सुसाईड नोट आढळली आहे. त्यात ‘भाजपात असता तर केसच झाली नसती, असे ईडी अधिकारी मला म्हणाला आणि तुझ्यावर इतकी कलमे जोडेन की राहुल गांधी पंतप्रधान झाल्यावरही ती हटवू शकणार नाहीत’, असे धमकवल्याचे नमूद केले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

मनोज परमार व त्यांच्या पत्नी नेहा या दोघांनी शुक्रवारी सकाळी आष्टा येथील घरी गळफास घेतला. ईडीने 5 डिसेंबर रोजी इंदोर व सिहोर येथील परमार यांच्या उद्योगाशी संबंधित चार ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यात मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्याबरोबरच बँक खाती गोठवली होती. पंजाब नॅशनल बँकेतील 6 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात ही कारवाई केली. ईडीच्या दबावतंत्रामुळे पती-पत्नीचा हकनाक बळी गेल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून केंद्रीय तपास यंत्रणा आणि सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठली आहे.

ईडी व भाजपवर आरोप

पोलिसांना घटनास्थळी पाच पानी सुसाईड नोट सापडली. त्यात परमार यांनी ईडीचे अधिकारी आणि भाजपच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी प्रचंड छळ केला. शिवीगाळ आणि मारहाण केली. राहुल गांधींविरुद्ध व्हिडीओ बनवण्यासाठी धमकी दिली, असे गंभीर आरोप परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत केले आहेत. ईडीबरोबर भाजपच्या लोकांनी छळ केल्यामुळेच आई-वडिलांनी आत्महत्या केल्याचा दावा परमार यांच्या मुलांनी केला आहे.

राहुल गांधींना ‘पिगी बँक’ दिली होती भेट

परमार यांच्या मुलांनी ‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधी यांना ‘पिगी बँक’ भेट दिली होती. त्यानंतर ईडीने छापेमारी तीव्र केल्याने परमार दाम्पत्य दबावाखाली आले होते. राहुल गांधी यांचे समर्थन केल्यानंतरच ईडीने नाहक त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच दबावातून परमार दाम्पत्याने आत्महत्या केल्याचा आरोप काँग्रेसने केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या नेत्यांनी परमार यांच्या मुलांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.

परमार यांच्या सुसाईड नोटमध्ये काय?

ईडीचे सहाय्यक संचालक संजीतकुमार साहू यांनी आपल्याला शिवीगाळ व मारहाण केली. तुम्ही भाजपमध्ये असता तर केसच झाली नसती. तुमच्या मुलांना भाजपमध्ये आणा. तसेच राहुल गांधी यांच्याविरोधात व्हिडिओ बनवा, असे बजावत साहू यांनी माझ्यावर दबाव टाकला. छापेमारीत माझा जबाब घेतला नाही. तो त्यांनी स्वतः लिहिला आणि त्यावर माझी सही घेतली. घरातून मोबाईल, कागदपत्रे काढून घेतली. अधिकारी वारंवार धमकावत होते. तुमच्याविरुद्ध इतकी कलमे जोडेन की राहुल गांधी पंतप्रधान झाल्यावरही ते हटवू शकणार नाहीत. प्रकरण मिटवा आणि मोकळे व्हा, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी मला दरडावले. आम्ही निर्देष असल्याचे मी सांगितले. पण त्यांनी काहीएक ऐकले नाही. माझी राहुल गांधींना विनंती आहे, मी गेल्यानंतर माझ्या मुलांची काळजी घ्या. त्यांना एकटे सोडू नका.

तुमच्या मुलांना भाजपात प्रवेश करायला लावा. तुम्ही राहुल गांधी यांच्याविरोधात व्हिडिओ बनवा तरच तुमची यातून सुटका होईल, असे ईडीचे सहाय्यक संचालक संजीत कुमार साहू यांनी परमार यांना धमकावले होते. परमार यांच्या मुलांनी भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांना पिगी बँक भेट दिली होती. त्यानंतर ईडीने परमार यांना घेरले. त्याच दबावातून त्यांनी जीवन संपवल्याचा आरोप काँग्रेसने केला.