शेतमालाला किमान हमीभाव देण्यासह विविध 13 मागण्यांसाठी पंजाब-हरयाणाच्या खनौरी सीमेवर शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांचे उपोषण सुरू आहे. त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 18 वा दिवस होता. शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे कानाडोळा केल्यामुळे शेतकरी संघटना मोदी सरकारविरोधात प्रचंड संतप्त झाल्या आहेत. आज संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी डल्लेवाल यांची भेट घेतली. शीख समुदाय हौताम्याला घाबरत नाही. डल्लेवाल आमचे ज्येष्ठ नेते असून आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, अशी घोषणाच त्यांनी केली.
दिल्लीला पुन्हा घेरावे लागेल, असेही टिकैत म्हणाले. आमचे राजे जनतेवर मेहरबानी करणारे नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, अंबालाच्या पोलीस अधीक्षकांनी शेतकऱ्यांना परवानगीशिवाय पुढे जाऊ दिले जाणार नसल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने डल्लेवाल यांच्याबाबत कडक आदेश दिले असून पंजाब आणि केंद्र सरकारला डल्लेवाल यांना लागेल ती वैद्यकीय मदत पुरवण्यास सांगितले आहे. तसेच आंदोलनापेक्षा डल्लेवाल यांचे जीवन महत्त्वाचे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
वजन 12 किलोने घटले
खनौरी सीमेवर डल्लेवाल यांच्याभोवती शेतकऱ्यांनी सुरक्षा कडे तयार केले आहे. त्यांच्यापर्यंत कुणी पोहोचू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, आज डल्लेवाल यांची प्रकृती आणखी खालावली. त्यांचे वजन तब्बल 12 किलोने घटले आहे. त्यामुळे त्यांची किडनी खराब होण्याचा धोका असून हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. डल्लेवाल हे कर्करोगाचेही रुग्ण आहेत. गुरुवारी अमेरिकेहून आलेल्या कर्करोगतज्ञ आणि सरकारी डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
डल्लेवाल यांच्यावर बळाचा वापर नको
शेतकऱ्यांनी शांतता राखावी तसेच डल्लेवाल यांच्यावर बळाचा वापर करण्यात येऊ नये, असेही सर्वोच्च न्यायालयाने सरकारला उद्देशून म्हटले आहे. शंभू सीमा खुली करण्यासंदर्भात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचे आदेश दिले आहेत. याच काळात सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीने आपला अंतरिम अहवालही सादर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 डिसेंबरला होणार आहे. दरम्यान, डल्लेवाल यांचे आमरण उपोषण तोडण्यासाठी पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे. डल्लेवाल यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे.